बेळगाव लाईव्ह:जर तुम्ही देवावर विश्वास ठेवलात, स्वतःवर विश्वास ठेवला आणि तुमच्या ध्येयासाठी कार्य केले तरच स्वप्ने सत्यात उतरतात, हे बेळगावच्या दिव्यांग स्त्री-पुरुष थ्रोबॉल खेळाडूंनी सिद्ध करून दाखवले आहे. या खेळाडूंनी भारतीय संघाला श्रीलंका येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पॅरा थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदकासह विजेतेपद मिळवून देत कर्नाटक राज्यासह बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आशियाई पॅरा थ्रोबॉल संघटनेतर्फे आयोजीत आंतरराष्ट्रीय पॅरा थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा श्रीलंका येथील कोलंबो येथे गेल्या 23 ते 26 जुलै 2024 या कालावधीत यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत जगातील विविध देशांचे मातब्बर संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व पुरुषांच्या संघात बेळगावच्या सुरज धामणेकर, महांतेश होंगळ, सुरेश कुंबर, इराण्णा होंडापनवर, मन्सूर मुल्ला व देवराज मंजुनाथ यांनी, तर महिला संघात मनीषा होंगल, गीता बी., ज्योती एस, भागीरती मलाली व संगीता अलदगीडद यांनी केले. या दिव्यांग खेळाडूंनी स्पर्धेत प्रारंभापासूनच वर्चस्व राखणाऱ्या भारतीय संघाला स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. पुरुषांच्या गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रतिस्पर्धी यजमान श्रीलंका संघाला 30 -26 अशा गुणफारकांनी पराभूत केले त्याचप्रमाणे महिला गटात भारतीय संघाने प्रतिस्पर्धी यजमान श्रीलंका संघावर 30 -18 अशा गुणफारकांनी विजय मिळविला.
खरे तर श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय पॅरा थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या आधी आर्थिक समस्येमुळे बेळगावच्या उपरोक्त खेळाडूंच्या स्पर्धेतील सहभागाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. यासाठी सदर खेळाडूंनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यावेळी हे दिव्यांग थ्रो बॉल खेळाडू पहिल्यांदाच परदेशात जात आहेत. इतर आंतरराष्ट्रीय संघ कदाचित अनुभवी आणि मजबूत असतील. गुंतवणूक खूप जास्त असल्याने त्यांना पाठवणे आणि जोखीम घेणे फायदेशीर नाही वगैरे नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. तथापि बेळगावच्या दिव्यांग थ्रो बॉल खेळाडूंनी आपले आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले असल्यामुळे त्यांचे हे स्वप्न भंग होऊ नये यासाठी आपली शिर्डी साईबाबा ट्रिप रद्द करून फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी सदर दिव्यांग खेळाडूंना आर्थिक मदत मिळवून देण्यात पुढाकार घेत प्रसिद्धी माध्यम, दानशूर व्यक्ती विविध संघ-संस्था संपर्क साधला. तसेच या सर्वांच्या मदतीने दिवस -वेळ कमी असताना देखील बेळगावच्या उपरोक्त दिव्यांग खेळाडूंच्या श्रीलंका दौऱ्यासाठी आवश्यक खर्चाचा निधी भारतीय थ्रोबॉल महासंघाकडे धाडला. ज्यामुळे वरील खेळाडूंचे फक्त श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेत सहभागी होण्याचे नव्हे तर त्या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविण्याचे स्वप्नही साकार झाले.
सदर खेळाडूंकरीता आर्थिक निधी उभा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना साधना पाटील, शैलेश भातकांडे, अवधूत तुडवेकर, स्वयम पाटील, विजय भद्र, पद्मप्रसाद हुली, गौतम शॉर्फ, दिलीप असोपा, सौरभ सावंत, कला मजुमदार, गणेश प्रभू, नंदिनी प्रभू, डॉ. नानखा, डॉ. राजश्री अनगोळ, सुनील धोंगडी, अमर एच, समृद्धा फाउंडेशन फॉर द डिसेबल्ड आदींसह इतर अनेक मित्र आणि हितचिंतकांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.
आता आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवून भारतीय संघ आपल्या देशाकडे रवाना झाला असून बेळगावच्या खेळाडूंचे उद्या शनिवारी सकाळी 9 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे तरी आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदक मिळवणाऱ्या या खेळाडूंच्या स्वागतासाठी क्रीडाप्रेमींनी उद्या बहुसंख्येने रेल्वे स्थानकावर उपस्थित रहावे, असे आवाहन संतोष दरेकर यांनी केले आहे.