Monday, December 23, 2024

/

येळ्ळूर फलक हटविण्याच्या त्या घटनेची दहा वर्षे…

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमालढ्याचा केंद्रबिंदू असलेल्या येळ्ळूर गावाच्या वेशीवर मानबिंदू समजल्या जाणाऱ्या “महाराष्ट्र राज्य येळ्ळूर” फलक निर्दयी कर्नाटक सरकारने काढून सिमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळले, याला आज 10 वर्षे पूर्ण झाली.

या जखमांना जरी दहा वर्षे लोटली असली तरी घाव मात्र तसेच आहेत. 2013 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागात समितीने पुन्हा आपले वर्चस्व राखत दोन आमदार निवडून आणले, हे कर्नाटक सरकारच्या व येथील कन्नड संघटनांच्या डोळ्यात हे खूपत होते, मुख्य म्हणजे बेळगावच्या दक्षिण मतदारसंघात कै. संभाजी पाटील हे निवडून आले होते आणि याच मतदार संघात “महाराष्ट्र राज्य येळ्ळूर” हा फलक कित्येक वर्षे सन्मानाने सीमाभागातील मराठी माणसाची व महाराष्ट्रात विलीन होण्याची साक्ष देत होता.

वारंवार कर्नाटक सरकार व येथील कन्नड संघटनांच्या डोळ्यात हा फलक खुपत होताच हे वेळोवेळी त्यांच्या मराठी विरोधी कृतीतून सिद्द होत होतेच. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत देशात सत्तांतर झाले आणि मोदी लाटेत भाजप सत्तेवर आला, बेळगावला स्मार्टसीटीचा दर्जा देत असताना या हिंदुत्ववादी सरकारने बेळगावचे नामकरण बेळगावी असे केले. हे थोडके होते म्हणून की काय येथील प्रशासनाने राजकीय व कन्नड संघटनांच्या दबावाला बळी पडत पोलिसांच्या दबावाने हा फलक काढून टाकला.

Yellur board
File pic : maharastra board yellur case 2014

फलक काढला म्हणून बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसणारे ते सिमावासीय येळ्ळूरकर कसले. येळ्ळूरचा मराठी बाणा दाखवत रात्रीत पुन्हा त्याच जागी “महाराष्ट्र राज्य येळ्ळूर” फलक अभिमानाने उभा केला आणि सीमाभागातील जनतेने कर्नाटकी खाकी प्रशासनाला जशास तसे उत्तर देत गावोगावी तसेच बेळगावच्या गल्लोगल्ली “महाराष्ट्र राज्य” फलक उभे केले.

मराठी द्वेषाने पछाडलेल्या कर्नाटकी प्रशासनाचा यामुळे तिळपापड झाला आणि निर्दयी पोलिसांनी येळ्ळूर गावात झोटिंगशाही सुरु केली. ना वृद्ध,ना महिला,ना बालक, ना युवक बघता लाठीचार्ज करून घराघरातून बाहेर काढून अमानुष लाठीहल्ला केला. ही बातमी बघता बघता संपूर्ण सीमाभाग व महाराष्ट्रात पसरली व याचा परिणाम आपल्यावरच उलटणार म्हटल्यावर प्रशासनाने हेमंत निंबाळकर यांना पाचारण करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, एकीककडे शांततेची नाटक करत प्रशासनाने येळ्ळूर गावकऱ्यावर तसेच विविध गावात “महाराष्ट्र राज्य” फलक लावणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल करत मराठी माणसावरील आपला आकस दाखवून दिला.

या घटनेला व गुन्हे दाखल होऊन येळ्ळूर्वासियांची दहा वर्षं लोटली पण प्रत्येक माणसाच्या मनात महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक अजूनही जशास तसा कोरून आहे. खटल्यातील तारखा पडतात वर्तमान पत्रात बातमी येते, तारीख पे तारीख चाललंय.

-एक सीमा वासीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.