बेळगाव लाईव्ह : मराठी माध्यमाचा न्यूनगंड बाळगून हल्ली मराठी माध्यमातूनच शिकून पुढे आलेल्या पालकांकडून इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी भाषेचा विनाकारण बाऊ केला जातो. समाजात ताठ मानेने वावरून मराठीचा उदो उदो करणाऱ्या अनेक दिग्गजांची मुलेदेखील इंग्रजी माध्यमातच शिकतात हे आपल्या मराठी भाषेचे दुर्दैव आहे.
परंतु एका विशिष्ट भाषेत शिकण्याचा आपल्या यशावर फार मोठा परिणाम होत नाही हे आजवर अनेक विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. कंग्राळ गल्ली येथील तेजस्वीनि कंग्राळकर या युवतीनेदेखील अशीच उत्तम कामगिरी करत चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेत यश मिळवून पुन्हा एकदा मराठी माध्यमाचा झेंडा उंचावला आहे.
सरकारी शाळा क्रमांक ११ मधून प्राथमिक तर महिला विद्यालय शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या तेजस्वीने मराठा मंडळ महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. अत्यंत मनाच्या आणि अवघड अशा समजल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमातून तेजस्वीनि कंग्राळकर सह बेळगाव जिल्ह्यात २८ जणांनी यश मिळविले आहे.
तेजस्वीनि कंग्राळकर या विद्यार्थिनीने मिळविलेल्या या यशाबद्दल उद्योजक महादेव रेडेकर, समिती नेते आर. आय. पाटील, दीपक पावशे, नगरसेवक शंकर पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. आपल्या या यशात आपल्या कुटुंबाचे आणि गुरुजनांचे मोठे पाठबळ असल्याचे तेजस्विनीने सांगितले. प्रत्येक कुटुंबाने मुलींना शिकण्यासाठी नक्की प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही तिने केले.
तेजस्विनीने मिळविलेल्या या यशानंतर कुटुंबियांना आनंदाश्रू अनावर झाले. मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी अशा पद्धतीने यश मिळवत आहेत हि अभिमानाची बाब असल्याचे मत आर आय पाटील यांनी व्यक्त केले.
तर या प्रभागाचे नगरसेवक शंकर पाटील यांनीही तेजस्विनीचे कौतुक करत तिने मिळविलेल्या यशामुळे आमच्या प्रभागाचा मान वाढल्याचे ते म्हणाले. मराठी समाजातील मुली इतक्या उत्तम पद्धतीने यश मिळवत आहेत, हि सकारात्मक बाब असल्याचे दीपक पावशे म्हणाले. तेजस्विनीने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी कंग्राळ गल्लीतील नागरिक उपस्थित होते.