बेळगाव लाईव्ह :आवश्यक नकाशे उपलब्ध न झाल्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट व्याप्तीतील नागरी वसाहतींचे सर्वेक्षण रखडले आहे.
या नागरी वसाहती बेळगाव महापालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार असल्यामुळे त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावकडून नकाशे मागवले होते. तथापि नकाशे थेट उपलब्ध करून न देता कॅन्टोन्मेंट बोर्डाने ते मिळविण्यासाठी औपचारिक अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता नकाशे मिळाल्यानंतर सर्वेक्षण पुन्हा सुरू होईल.
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आणि महापालिकेचा महसूल गोळा करणे यासारख्या इतर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असूनही मनपा कर्मचारी कॅन्टोन्मेंटमध्ये सर्वेक्षण करण्यात गुंतले होते. मात्र हे सर्वेक्षण केवळ एक दिवस चालले. आता नकाशे मिळाल्यावर सर्वेक्षण पुन्हा सुरू होईल, असे महापालिकेने सांगितले आहे.
नकाशांसाठी महापालिकेने कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे लेखी अर्ज दिला आहे. कँटोन्मेंट बोर्ड आणि महानगरपालिका यांच्यात या नागरी वसाहतींचे हस्तांतरण सुरू असून त्यासंबंधीच्या चर्चेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन सक्रिय सहभाग दर्शवत आहेत. हस्तांतर प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती आणि नकाशे मिळणे आवश्यक आहे. तथापी कॅन्टोन्मेंट बोर्डाने नियमांचा हवाला देत नकाशे थेट उपलब्ध करून देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कोणत्या वस्त्या हस्तांतरित करायच्या यावरून मतभेद झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित अन्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले असून गेल्या 26 जुलैपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मनपा पथकाने आरटीओ सर्कल ते किल्ला भाजी मार्केटपर्यंतच्या 60 एकर जागेचे सर्वेक्षण केले. मात्र आता नकाशांअभावी सर्वेक्षण रखडले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील सर्व वस्त्या हस्तांतरित कराव्यात असे तेथील नागरी वसाहतींमधील रहिवाशांचे मत आहे. तथापि, बोर्डाने केवळ कांही वसाहतींचे हस्तांतरण प्रस्तावित केले आहे. ज्यावरून एक मत न होता हस्तांतरण प्रक्रिया रखडली आहे. नकाशे उपलब्ध नसल्यामुळे सर्वेक्षणही थांबवण्यात आले आहे.