बेळगाव लाईव्ह: जादू टोणा करणी बाधा उताऱ्या साठी रस्त्यावर टाकलेला नारळ लिंबू घेत सर्प मित्र शिवानी चिट्टी यांनी अंध श्रध्देवर जनजागृती केली आहे.
अलिकडे बेळगाव परिसरात नारळ, कोहाळे, लिंबू टाकून करणीव्दारे शत्रूचा बंदोबस्त व स्वतःच भल करण्याची अंधश्रद्धा वाढत चालली आहे. अगदी शिकलेले लोक ही याला बळी पडत आहेत. ग्रामीण भागात तर या गोष्टीला उधाण आले असून अशा प्रकाराने गाव घरात ,भाऊबंदकीत वाद विकोपाला जाऊन मारामारी खूनापर्य॔त प्रकरण पोहोचत आहेत. मानवी प्रगतीत अडथळा आणणाऱ्या व समाजात तिरस्कार निर्माण करणार्या अशा घटनांचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
कांही लोक करणीच्या प्रकाराला अजूनही प्रचंड घाबरतात तर काहीजण हा प्रकार म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे असे मानतात. सर्पमित्र आनंद व शिवानी चिठ्ठी हे त्यापैकी एक आहेत. करणीचा असाच एक प्रकार आज सकाळी उचगाव प्रवेशद्वारावर सर्पमित्र शिवानी चिठ्ठी याना तूरमूरी येथून सर्प पकडावयास गेल्या असता दृष्टीस पडला.
त्यांनी त्यातील चांगले नारळ, लिंबू खावयास घेतले. तसेच करणीचे असे भीतीदायक प्रकार निव्वळ अंधश्रद्धा असून त्यामुळे कोणाचे काहीही बिघडत नाही. फक्त बुवाबाजी करणाऱ्यांचे खिसे गरम होतात आणि सध्याच्या महागाईच्या दिवसात अशा नारळ, लिंबू वगैरे सारख्या वस्तू रस्त्यावर फेकून वाया घालवल्या जातात, असे त्यांनी सांगितले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी समाजानेच पुढाकार घ्यायला हवा.
आम्ही नेहमीच करणीसाठी टाकलेल्या वस्तू खावयास वापरतो. यातील टाचणी गुलाल यामुळे मुक्या जनावराना त्रास होतो हे देखील लक्षात घेतले पाहिजे. मनुष्याच्या अंधश्रद्धेमुळे त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना अपाय होत असतो. करणी बाधा, जादूटोणा वगैरे या सर्व गोष्टी भोळ्या भाबड्या अंधश्रद्धाळू लोकांची फसवणूक करण्यासाठी असतात असेही शिवानी चिठ्ठी यांनी स्पष्ट केले.