बेळगाव लाईव्ह :मुतगे येथील विविधोध्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नियमित या संस्थेतील गैर कारभार भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वितरित करावे, या मागणीसाठी मुतगे येथील संतप्त शेतकऱ्यांनी आजपासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुतगे येथील शेतकऱ्यांनी विविधोध्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नियमितच्या कार्यालय प्रवेशद्वारात हे आमरण उपोषण सुरू केले आहे. आपल्या उपरोक्त मागणीसाठी सदर शेतकऱ्यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात देखील याच पद्धतीने आमरण उपोषण केले होते. मात्र मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन त्यावेळी अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार केला होता. परिणामी गेल्या सहा-सात महिन्यात कोणतीच कार्यवाही न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आजपासून पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सदर आंदोलनात बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले आहेत.
आंदोलन स्थळी बेळगाव लाईव्हला माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील म्हणाले की, या कृषी सहकारी संघातील गैरकारभार -भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाबाबत गेल्या नोव्हेंबरच्या प्रारंभी आम्ही उपोषण केले होते. त्यावेळी उपोषणाच्या सहाव्या दिवशी डीसीसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी आमची भेट घेऊन आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले होते. तसेच या सहकारी संघामध्ये जो गैरकार भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करून एक महिन्यात तुम्हाला अहवाल देऊ आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासनही दिले होते.
तथापि गेल्या सहा -सात महिन्यांमध्ये आम्ही सतत पाठपुरावा करून देखील आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे डोळेझाक करण्याचे काम सुरू झाले आहे. या मागचे गौडबंगाल काय आहे? हे आम्हा गावकऱ्यांना आणि या सहकारी संघाचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज करूनही सहा -सात महिने झाले आहेत. त्यावेळी केडीसीसीकडून मिळणार कर्ज आम्ही तुम्हाला 15 दिवसात देतो असे आश्वासन देण्यात आले होते. तथापि आता 7 महिने झाले एकाही शेतकऱ्याला कर्ज मिळालेले नाही.
त्याकरता पुन्हा आम्ही आमचं हे आमरण उपोषणाचे शस्त्र हाती घेतले आहे असे सांगून जोपर्यंत आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही आणि गैरप्रकार -भ्रष्टाचाराच्या चौकशीचा अहवाल आमच्या हाती पडत नाही, तसेच दोषींवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील. आम्ही आमच्या या निर्णयावर ठाम आहोत असे सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.