Saturday, December 21, 2024

/

मच्छे येथील गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह : इंस्टाग्राम रॅलीच्या माध्यमातून प्रेमात पडलेल्या म्हैसूरमधील युवतीने प्रियकराच्या भरवशावर बेळगाव गाठले.२३ वर्षीय मंजुळा उर्फ नयना नामक युवती हि बेळगावच्या मच्छे गावात वर्षभरापूर्वी लग्न करून आली होती. मात्र आज अचानक तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याप्रकरणी अनेक शंका – कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत.

आपले गाव, आई – वडील सर्वकाही मागे सोडून म्हैसूरहून बेळगावला आलेल्या या युवतीच्या मृत्यूवर तिच्या पालकांनी संशय व्यक्त केला असून आपल्या मुलीचा खून झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

म्हैसूरमधील कुंबरकोप्पळ येथील मंजुळा उर्फ नयना नावाची युवती आणि बेळगाव तालुक्यातील मच्छे गावचा बोरेश या दोघांची इंस्टाग्रामवरील रीलच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. मंजुळाने आपले गाव सोडून बेळगावमध्ये येऊन बोरेशसोबत लग्न केले.

हि बाब युवतीच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी बेळगावमधून पुन्हा आपल्या मुलीला म्हैसूरला नेले. परंतु त्यानंतर पुन्हा सदर युवती घरातून पळून येऊन आपल्या पतीसोबत राहू लागली. या घटनेनंतर वैतागलेल्या पालकांनी आपली मुलगी सुखी राहावी या उद्देशाने हा विषय इथेच थांबविला.

वर्षभरापासून आनंदी आयुष्य जगत असलेल्या कुटुंबात अलीकडेच फूट पडल्याची माहिती मिळाली असून मृत मंजुळा हि ३ महिन्यांची गर्भवती असल्याचेही समजते आहे. आपल्याला मूल नको यावर बोरेश ठाम असल्याने त्याला हे मान्य नव्हते. मंजुळाने गर्भपात करावा यासाठी तिच्यावर दबाव आणला जात असल्याची माहिती उपलब्ध झाली असून अचानकपणे मंजुळा मृतावस्थेत आढळून आल्याने मृत युवतीच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

आपल्या मुलीला गुदमरून मारण्यात आले आणि त्यानंतर बोरेशचे कुटुंब फरार झाल्याचा आरोप मृत युवतीच्या पालकांनी केला आहे. प्रकारानंतर घटनास्थळी डीसीपी रोहन जगदीश यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना ते म्हणाले, मृत युवतीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून संशयितांची चौकशी केली जाईल, तसेच दोषींवर कडक कारवाई देखील केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिवाय फरार झालेल्या आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.