बेळगाव लाईव्ह : सर्वोच्च न्यायालयाने जिल्हापातळीवर ‘सर्वोच्च न्यायालय विशेष लोकअदालती’चे आयोजन केले असून येत्या २९ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत बेळगाव जिल्हा न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय विशेष लोकअदालत होणार आहे. या लोकअदालतीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील जनतेने सहभाग दर्शवावा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव न्यायमूर्ती मुरली मोहन रेड्डी यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकार, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून ही विशेष लोकअदालत सुरू केली आहे. संपूर्ण देशभरात ही लोकअदालत होणार आहे. या लोकअदालतीमधून सर्वसामान्य जनतेला तातडीने न्याय मिळावा, हाच यामागचा उद्देश आहे. सर्वोच्च न्यायालयातून वर्ग झालेल्या खटल्यांचा निकाल देण्यासाठी जिल्हा न्यायाधीशांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांबरोबरच इतर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश या लोकअदालतीमध्ये उपलब्ध राहणार आहेत. त्यांच्या माध्यमातूनच हे खटले निकालात काढले जाणार आहेत. या लोकअदालतीमध्ये कोणत्याही कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश कार्यरत राहणार नाहीत, असे देखील स्पष्ट करण्यात आले.
विशेष लोकअदालतीमधून केवळ सर्वोच्च न्यायालयातील खटलेच निकालात काढले जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. बेळगाव न्यायालयातही पक्षकाराला येण्याची गरज नसून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील पक्षकारांनाही याचा मोठा लाभ होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार आहे. वर्षानुवर्षे न्यायालयीन कचाट्यामध्ये सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला या सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीमधून न्याय मिळणार आहे.
कोणत्याही खटल्याचा कनिष्ठ न्यायालयात निकाल आपल्या विरोधात लागल्यानंतर पक्षकार पुन्हा न्यायासाठी वरिष्ठ न्यायालयात त्या खटल्यासंदर्भात अपील करतो. असे अपील थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत केले जातात. यामध्ये खर्ची जाणारा वेळ आणि पैसा वाचावा आणि जनतेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी देशात पहिल्यांदाच अशी लोकअदालत भरविण्यात येत असल्याने पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेळगाव जिल्हा न्यायालयातील ४७ खटल्यांचे कामकाज पूर्ण झाले आहे. त्याचा लवकरच निकाल दिला जाईल, असेही ते म्हणाले.
१३ जुलै रोजी विशेष लोकअदालत
बेळगाव लाईव्ह : अपघात प्रकरणे, विभागीय प्रकरणे, शेतकऱ्यांची जमीन अतिक्रमण प्रकरणे, फसवणूक, धनादेश बाऊन्स प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी बेळगावात येत्या १३ जुलै रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव न्यायमूर्ती मुरली मोहन रेड्डी यांनी दिली.
गुरुवारी बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना न्यायमूर्ती मुरलीमनोहर रेड्डी म्हणाले, जिल्हा न्यायालयात बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या वैवाहिक, अपघात, कौटुंबिक समस्या, चेक बाऊन्स प्रकरण, भूसंपादन, फसवणूक यासारखी प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील जनतेने सहभाग दर्शवावा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव न्यायमूर्ती मुरली मोहन रेड्डी यांनी केले आहे.