बेळगाव लाईव्ह :गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नदी नाल्यांना पूर आल्यामुळे कांही रस्ते बंद झाले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश गावांचा वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडित झाला असल्यामुळे रात्रीच्या वेळी हा भाग अंधारात बुडत आहे खानापुरात नेमकी परिस्थिती काय आहे याचा बेळगाव लाईव्ह च्या ग्राउंड रिपोर्ट मधून घेण्यात आलेला आढावा..
येथील मलप्रभा नदीची पाणी पातळी वाढली असून खानापूर नदी घाटाच्या ठिकाणी पूर आला आहे. खानापूर -हेम्माडगा गोवा रोडवरील हालत्री पुलावर पाणी आल्यामुळे तो मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून चोर्ला व अनमोड घाटातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अवजड वाहनांची वाहतूक अळणावर, हल्ल्याळ, कारवार मार्गे गोव्याला वळविण्यात आली आहे. मात्र यामुळे अनमोडसह गोव्यामध्ये बेळगाव येथून होणारा दूध, भाजीपाला वगैरे जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा बंद झाला आहे. परिणामी नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्यामुळे सदर मार्गावर जीवनावश्यक साहित्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील प्रवेश बंदीचे निर्बंध हटवावेत, अशी मागणी केली जात आहे. काल सोमवारपासून वाढलेला मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे खानापुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून बैलूर, शिरोली गावासह रामनगर पट्ट्यात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
अधिकाऱ्यांचा वचक नसलेल्या हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या कामचकारपणामुळे अद्याप वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे सध्या खानापूरच्या पश्चिम भागातील बहुतांश गावे विजे अभावी गावे रात्रीच्या वेळी अंधारात बुडून जात आहेत. नदी नाल्यांनी आपली पातळी ओलांडल्यामुळे बहुतांश रस्ते पाण्याखाली गेलेआहेत.
खानापूर तालुक्यात गेल्या दोन वर्षात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. तथापि यंदा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सतत महिनाभर पाऊस सुरू आहे. पाऊस भरपूर पडत असला तरी नदी, नाल्यांची पातळी म्हणावी तितकी वाढलेली नाही. तसेच नदीचे पाणी वेगाने थेट धरणापर्यंत पोहोचत असल्यामुळे दरवर्षी निर्माण होणारी पूर परिस्थिती अद्याप उद्भवलेली नाही ही एक प्रकारे निसर्गाची कृपाच आहे. मात्र खानापूरच्या पश्चिम भागातील बऱ्याचश्या गावांचा पुरामुळे खानापूर व बेळगावशी असलेल्या संपर्क तुटला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पश्चिम भागातील पुलांची उंची वाढवी, पूर परिस्थिती टाळण्यासाठी शासनाने शाश्वत योजना राबवावी अशी अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे राज्य शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळीही पावसाळ्यात खानापूर पश्चिम भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
अनेक गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. शाळा कॉलेजेसना विद्यार्थी पोहोचू शकत नाहीत, अशा कठीण परिस्थितीतून या भागातील जनता जात आहे. तेंव्हा सरकारने हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेऊन खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागाची विशेष करून पावसाळ्यात जी दुरावस्था होते ती दूर करण्यासाठी शाश्वत योजना आखावी अशी खानापूर वासिय मागणी करत आहेत.
तसेच दरवर्षी पावसाळा आला की खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित होतो. मात्र यावेळी जितक्या मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाला आहे तितका यापूर्वी कधी झाला नव्हता. डोंगराळ, दुर्गम भाग दूरची गोष्ट सध्या खानापूर गावातील वीज दिवसातून किमान 20 वेळा गायब होत आहे. त्यामुळे हेस्कॉमच्या कारभाराला येथील जनता अक्षरशः वैतागून गेली आहे. मध्यंतरी एका विशिष्ट समाजाच्या सणा दिवशी वीज पुरवठा दिवसभर व्यवस्थित सुरळीत सुरू ठेवण्यात आला होता. मात्र तेच इतर समाजांच्या सणा दिवशी वीज पुरवठा वारंवार खंडित केला जातो याला काय म्हणावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेंव्हा खानापुरातील हेस्कॉमचा ढिसाळ कारभार सुधारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या ठिकाणी कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नाईलाजाने जनतेकडून होत आहे.
चौकशी केली असता असे समजते की तालुक्यात 125 लाईनमन्सची कमतरता आहे. परिणामी व्याप्तीने मोठ्या असलेल्या खानापूर तालुक्यात हेस्कॉमचे काम परिणामकारक होत नाही आहे. यासाठी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन खानापूर तालुक्याला आवश्यक असलेल्या संख्येत लाईनमन्सची ताबडतोब नियुक्ती करण्याची गरज आहे.
खानापूर तालुक्यासाठी पूर्वी हेस्कॉमचे डिव्हिजन आणि दोन सब डिव्हिजन मंजूर झाले आहेत. त्यासाठी सुसज्ज इमारतही बांधण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत फक्त एकच डिव्हिजन सुरू असून लवकरात लवकर आणखी एक डिव्हिजन आणि सब डिव्हिजनची व्यवस्था केली जावी. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या वाढेल आणि खानापूर तालुक्यातील विजेची समस्या दूर होईल अशी जनतेची अपेक्षा आहे. यासाठी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार विश्वेश्वर हेगडे -कागेरी आणि तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी देखील मागणी होत आहे. जर येत्या महिन्याभरात हेसकॉमचा कारभार सुधारला नाही तर येथील हेस्कॉम कार्यालयाला टाळे ठोकण्याची तयारी देखील तालुक्यातील जनतेने ठेवली आहे. याचीही इस्कॉनच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशीही मागणी होत आहे.