बेळगाव लाईव्ह : खानापूर शहरातील नूतन बस स्थानक आणि इस्पितळावर मराठी फलक लावण्याचा मागणीचा मुद्दा पेटला असताना खानापूर शहरातील नूतन बस स्थानक आणि इस्पितळाचा येत्या शुक्रवार दि. 12 जुलै रोजी होणारा उद्घाटन समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. अधिवेशन झाल्यानंतर या लोकार्पण सोहळ्याची तारीख ठरवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अचानक घेतलेल्या निर्णयामुळे हा एक चर्चेचा विषय झाला आहे. खानापूर तालुक्याच्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या हायटेक बस स्थानक इमारत तसेच माता आणि शिशु हॉस्पिटल इमारतीसह हेस्कॉम कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ येत्या शुक्रवार दि. 12 जुलै रोजी होणार होता.
हा समारंभ मंत्री तसेच जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार होता. परंतु येत्या 15 ते 26 जुलै दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनचा कालावधी असल्याने खानापुरातील सदर उद्घाटन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज (बुधवार, दि. १०) प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सदर उद्घाटन समारंभ केल्यास मान्यवर मंत्री, आमदार, खासदार गैरहजर राहू शकतात.
ही बाब लक्षात घेऊन येत्या शुक्रवार दि. 12 जुलै रोजी होणारा उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून अधिवेशन झाल्यानंतर या लोकार्पण सोहळ्याची तारीख ठरवण्यात येणार असल्याचे आमदार हलगेकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, खानापूर तालुक्यातील काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी खानापूर हायटेक बस स्थानक, एमसीएच इस्पितळ वगैरे प्रकल्प माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरले आहेत. त्यामुळे त्याचे श्रेय विद्यमान आमदारांनी लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट केले आहे.
खानापूर येथील सरकारी विश्राम धाम येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जाधव यांनी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच या कामांचे श्रेय लाटण्याचा जो प्रयत्न केला जात आहे त्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.