Friday, December 20, 2024

/

गोकाक फॉल्स येथे अतिउत्साही पर्यटनाला लगाम आवश्यक

 belgaum

बेळगाव लाईव्ह:आंबोलीसह पश्चिम घाटमाथ्यावर होणाऱ्या संततधार पावसामुळे घटप्रभा नदीला पूर येऊन बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा प्रवाहित झाला आहे. मात्र या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यटनाचा आनंद लुटत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

चंदगड, आजरा, आंबोली परिसरात संततधार पावसाने ताम्रपर्णी, घटप्रभा, चित्री, हिरण्यकेशी नद्यांना पूर येऊन गोकाक धबधबा प्रवाहित झाला आहे. सध्या ताम्रपर्णी, घटप्रभा नदीचे पाणी हिडकल जलाशयात अडविले जात आहे. चित्रीचेही पाणी अडविले असले तरी हिरण्यकेशी नदीचे पाणी घटप्रभा नदीद्वारे गोकाकच्या धबधब्यावरून कोसळत आहे.

पूर्ण प्रवाहित झालेला हा धबधबा पाहण्यासाठी सध्या गोकाक फॉल्स येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वर्षा पर्यटन आणि धबधब्यांजवळील वावरासंदर्भात दरवर्षी धोक्याचा इशारा दिला जात असतो. त्यानुसार यंदाही तो देण्यात आला आहे. मात्र तरीही सध्या अतिउत्साही पर्यटक रोरावत कोसळणाऱ्या गोकाकच्या धबधब्याजवळ धोकादायकरित्या पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत.Falls

सध्याच्या पावसाळी वातावरणात कोणत्याही क्षणी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे या पद्धतीने गोकाक फॉल्स सारख्या विशाल धबधब्यानजीक पर्यटनाचा आनंद लुटणे कांही क्षणात जीवावर बेतणारे ठरू शकते. गोकाकचा धबधबाच नव्हे तर प्रत्येक धबधब्याच्या ठिकाणी यापूर्वी पर्यटकांनी जपून राहिले पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसात तर धबधब्या जवळ जाऊन किंवा नदीत पात्रातील खडकावर उभारून सेल्फी काढणे, प्रवाहित नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न करणे वगैरे प्रकार जीवघेणे ठरू शकतात. अलीकडच्या काळात अति उत्साही हलगर्जी पर्यटन वृत्तीमुळे अशा धबधब्यांच्या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हीच अतिउत्साही हलगर्जी पर्यटन वृत्ती सध्या गोकाकच्या धबधब्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. तेंव्हा प्रशासनाने गोकाक धबधबा येथील पर्यटन सुरक्षितकडे गांभीर्याने लक्ष देऊन अतिउत्साही पर्यटकांना लगाम घालावा. एखादी दुर्घटना घटना पूर्वी वेळीच योग्य ती उपाययोजना करावी आणि सुविधा व सुरक्षा यंत्रणा पुरवल्याखेरीज पर्यटकांना धबधबा अथवा नदीपत्रापर्यंत प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी जागरूक पर्यटकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.