बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला होता. जून महिन्यात पावसाच्या तुरळक सरी बरसल्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यावधीत पावसाने मुसळधारपणे कोसळण्यास सुरुवात केली. साधारण २२ जुलै पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने २७ जुलै रोजी काहीशी विश्रांती घेतली. मात्र सकाळपासून उघडीप आणि दुपारनंतर पुन्हा मुसळधार पावसामुळे संपूर्ण बेळगावकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. नद्या, नाले ओसंडून वाहू लागले.
महाराष्ट्रातील पश्चिम घाटात होणाऱ्या पावसाचे परिणाम नेहमीच बेळगाववर दिसून येतात. याच अनुषंगाने यंदाही हे परिणाम दिसून आले. महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या पाण्याचा विसर्ग सुरु झाला आणि परिणामी बेळगाव जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. पावसाचा ओघ पाहून जिल्हा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, सहाय्यक आयुक्त, आपत्ती निवारण विभाग, जल संसाधन विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन यासह विविध विभागांच्या सहकार्याने संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्ह्याचा दौरा केला. सर्व विभाग, पालकमंत्री यांच्याशी समन्वय साधून महाराष्ट्रातून होणारी पाण्याची आवक योग्य पद्धतीने व्यवस्थापित केले, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना दिली.
बेळगाव जिल्ह्यातील नद्या – जलाशयांमध्ये होणारी पाण्याची आवक योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व विभागाच्या आणि पालकमंत्र्यांच्या सहकार्याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली.
वाढणाऱ्या पाणी पातळीचे उत्तम व्यवस्थापन करत महाराष्ट्रातील कृष्णा नदीतून होणाऱ्या २.५ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग राजापूर राजापूर बॅरेजमधून कल्लोळ बॅरेजमार्गे हिप्परगीमार्गे अलमट्टी जलाशयात सोडण्यात आला. याचप्रमाणे घटप्रभामधून होणाऱ्या ६० ते ७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हिडकल डॅम आणि लोळसूर ब्रिजमार्गे अलमट्टी धरणात वळविण्यात आला. ५ दिवसांपूर्वी ३ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग अलमट्टी मधून सुरु करण्यात आला. मुसळधार पावसामुळे अलमट्टी जलाशय क्षमतेपेक्षा ८५ टक्के भरलेले होते. मात्र उत्तम व्यवस्थापनामुळे जलाशयातील पाणीसाठा ५५ टक्क्यांवर आणण्यात यश मिळविता आले.
गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यात १५ मिमी तर कोल्हापूरमध्ये १९ -२० मिमी पाऊस झाला असून महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात पावसाचा ओघ कमी झाला आहे. साताऱ्यातील कोयना डॅममधून रायचूर आणि नारायणपूर डॅमपर्यंत पाणी व्यवस्थापनासाठी उत्तम सहकार्य मिळत आहे. कोयना डॅम पूर्ण क्षमतेने भरले असून या डॅम मधून पाण्याचा अतिरिक्त विसर्ग सुरु झाला तर या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाला २ ते अडीज दिवस लागतील अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. आता कर्नाटकातील विविध जलस्रोत किंवा महाराष्ट्रातून बेळगावमार्गे कितीही पाण्याचा विसर्ग झाला तरी कोणताही धोका उद्भवणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.