बेळगाव लाईव्ह : खानापूरमधील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आदित्य मिलिंद शिंदे या मुलाचे अपहरण झाले. मात्र केवळ मुलाच्या धाडसीवृत्तीमुळेच या मुलाचा जीव वाचला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खानापूर रेल्वेस्थानक परिसरात राहणाऱ्या आदित्य मिलिंद शिंदे नामक मुलाचे मंगळवार दि. ९ जुलै रोजी खानापूर रेल्वेस्थानकावरून अपहरण करण्यात आले.
रेल्वेरूळ पार करून पलीकडे दुकानात जाणाऱ्या मुलाला मागून काही अज्ञातांनी येऊन रुमालात गुंगीचे औषध वापरून तोंडावर धरले. यानंतर सदर मुलाला रेल्वेतील दिव्यांगांच्या डब्यात डांबण्यात आले. यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच रेल्वेतील इतर डब्यातून प्रवास केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा सारा प्रकार घडल्यानंतर सदर मुलाला रेल्वे धारवाड पर्यंत आल्यानंतर थोडी जाग आली. प्रसंगावधान राखून मुलगा रेल्वेतून उतरून रेल्वेस्थानकावरच झोपी गेला. बराच वेळ उलटल्यानंतर रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांनी मुलाला जागे करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अपहरण झालेला मुलगा आणि रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या संवादादरम्यान संशय आल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी मुलाला काही प्रश्न विचारले असता हा मुलगा बेळगावच्या खानापूर भागातील असल्याचे समजले. झोपेच्या धुंदीतच असणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांचा मोबाईल क्रमांक योग्यपद्धतीने सांगितला. आणि यामाध्यमातूनच पालकांशी संपर्क करून मुलाला धारवाड पोलीस स्थानकाकडे सुपूर्द करण्यात आले.
इकडे मुलाच्या कुटुंबीयांनी रात्री १० वाजले तरीही आपला मुलगा परतला नसल्याचे पाहून शोधाशोध सुरु केली. खानापूर पोलिसांशी संपर्क साधला. याचदरम्यान धारवाड पोलीस स्थानकातून मुलगा सापडल्याचा फोन आला. यावेळी कुटुंबियांना थोडा धीर आला. तातडीने त्यांनी हि बाब खानापूर पोलिसांना कळविली आणि लागलीच मुलाला आणण्यासाठी कुटुंबीयांची लगबग सुरु झाली. कुटुंबियांचे नातेवाईक अळणावर भागात रहात असल्याने त्यांनी पुढे धारवाड गाठले आणि तिथून मुलाला ताब्यात घेऊन मुलाच्या पालकांकडे सुपूर्द केले. सायंकाळी ६ पासून सुरु झालेली हि लगबग मध्यरात्री ३.३० च्या दरम्यान अखेर संपली आणि मुलाला ताब्यात घेऊन, मुलगा सुखरूप असल्याचे पाहून कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या साऱ्या प्रकारानंतर तातडीने म. ए. समितीचे धनंजय पाटील आणि सहकाऱ्यांनी खानापूर रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. रेल्वेस्थानकावर सीसीटीव्हीची सोय नसल्याने तातडीने सीसीटीव्ही बसविण्याची विनंती रेल्वे अधिकाऱ्यांना करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले, की खानापूर पोलीस स्थानकातर्फे यापूर्वीच सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात सूचना केली आहे.
यानुसार हुबळी विभागाकडे सीसीटीव्ही बसविण्यासाठी खानापूर रेल्वे विभागाने पत्र पाठवून मागणीही केली आहे. अद्याप हि प्रक्रिया पूर्ण झाली नसून लवकरात लवकर सीसीटीव्ही बसविण्यासाठी कारवाई करण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खानापूर रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती धनंजय पाटील यांनी दिली आहे.
एकंदर हा प्रकार लक्षात घेता, हि बाब सहज आणि सोपी नाही हे लक्षात येते. या घटनेमागील गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. मुलगा वयाने लहान असला तरी त्याच्या धाडसी वृत्तीमुळे आणि प्रसंगावधानामुळे त्याचा जीव बचावला आहे. मात्र अशा घटना भविष्यात घडणार नाहीत याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. एकीकडॆ खानापूरचे लोकप्रतिनिधी एक्स्प्रेस रेल्वे खानापूर रेल्वेस्थानकावर थांबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक लहान मोठ्या आस्थापनांवर सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र रेल्वेस्थानकासारख्या महत्वाच्या ठिकाणीच सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनर्थ घडला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हा मुलगा सुखरूप परतला आहे. मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी रेल्वे विभागासह स्थानिक प्रशासनानेही गांभीर्याने या घटनेची दखल घेणे महत्वाचे आहे.