बेळगाव लाईव्ह:आयुष विभागाच्या अधिसूचनेनुसार डेंग्यू लसीकरण शिबिरे आयोजित करण्यासाठी आता परवानगी अनिवार्य आहे.
योग्य अधिकृततेशिवाय डेंग्यू प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिरे आयोजित करताना आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीस केपीएमई कायद्यांतर्गत परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सुंधोळी यांनी दिला आहे.
बेळगाव जिल्ह्यात डेंग्यूवर होमिओपॅथिक औषधाचा वापर सुरू आहे. शहर परिसर आणि जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले असून कांहींचा डेंग्यू सदृश्य आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्यावतीने या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप पूर्णपणे डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही.
अलीकडे बऱ्याच संघ -संस्था, संघटना, सामाजिक संघटना, तसेच लोकप्रतिनिधींकडून विविध भागात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
मात्र लसीकरणाचे औषध डेंग्यू प्रतिबंधक असल्याबाबत कोणीच खात्री करून घेत नसून याबाबत आयुष्य खात्यास कोणतीच माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी यापुढे लसीकरण शिबिरे भरवण्यासाठी आयुष्य खात्याची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अन्यथा संबंधितांविरुद्ध केपीएमई कायद्यांतर्गत अंतर्गत कारवाई करण्यात येईल. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आरोग्य खात्याने हा निर्णय घेतला आहे. आरोग्यविषयक कोणत्याही समस्यांसाठी नागरिकांनी पात्र वैद्यकीय व्यावसायिकांकडूनच (डॉक्टर) उपचार घ्यावेत, असे जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ. श्रीकांत सुनधोळे यांनी स्पष्ट केले आहे