बेळगाव लाईव्ह :छत मोडकळीस आलेल्या धोकादायक बस थांब्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केलेली मागणी आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय समोरील बस थांब्याचे छत युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचा आणि राणी कित्तूर चन्नमा सर्कल येथील संबंधित जुना बस थांबा बदलून नवा उभारण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांनी दिला आहे.
शहरातील डॉ भीमराव आंबेडकर उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या स्मार्ट बस थांब्यांचे कोसळण्याच्या स्थितीत असलेले धोकादायक छत ताबडतोब दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी आज सकाळी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे केली होती.
त्याचप्रमाणे या धोकादायक बस थांब्यांसंदर्भातील बेळगाव लाईव्हसह अन्य प्रसिद्धी माध्यमानी बातम्याही प्रसिद्ध केल्या होत्या. दरेकर यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत आता प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बस थांब्याची सर्वोच्च प्राधान्याने दुरुस्ती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे राणी चन्नमा सर्कलजवळील बस थांबा जो जुना आणि गंजलेला आहे तो आजच्या आज काढला जाईल.
महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांनी आज स्वतः संबंधित दोन्ही बस थांब्याची जातीने पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्यासह महापालिकेचे अभियंते उपस्थित होते. पाहणीअंती आयुक्त दूडगुंटी यांनी अभियंत्यांच्या पथकाला शहरातील सर्व बस थांब्यांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळ डॉ. भीमराव आंबेडकर बागेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील नव्या बस थांब्याच्या आराखड्यासाठीचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
दरम्यान या पद्धतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि महापालिका आयुक्त अशोक दुडागुंटी यांनी राणी चन्नमा सर्कल आणि डीसी ऑफिस समोरील बसस्टॉप येथील 2 प्रमुख बस थांब्यांच्या समस्येबाबत त्वरेने कार्यवाही केल्याबद्दल एफएफसीचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.