बेळगाव लाईव्ह : एकेकाळी ओढा असणारा नाला झाला त्या नाल्यातील पाणी काही काळी येण्यासाठी वापरत होते मात्र आज हा नाला नसून अवस्था गटार बनली आहे. ओढ्याचा नाला झाला तो नालाच रहावा असे शेतकऱ्यांना वाटते मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि बेळगाव महापालिकेमुळेच बळळारी नाल्याला पूर येतो आरोप शेतकरी नेते नारायण सावंत यांनी केला आहे.
दरवर्षी बळ्ळारी नाल्याला पूर येऊन हजारो एकर जमिनीतील शेत पिकांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होते. बळ्ळारी नाल्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने गेल्या कित्येक वर्षापासून दर पावसाळ्यात ही गंभीर समस्या उद्भवत असते. बळ्ळारी नाल्याच्या विकासाचा विषय गेल्या सुमारे 25 वर्षापासून प्रलंबित आहे. या कालावधीत कित्येक आमदार खासदार होऊन गेले, सरकार बदलली, मात्र बळ्ळारी नाल्याची समस्येचे निवारण कोणालाही करता आलेले नाही. या नाल्याच्या विकासासाठी शेतकरी नेते नारायण सावंत सतत लढा देत असून सरकार दरबारी त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी त्यांनी सध्या जलपर्णीने व्यापलेल्या बळ्ळारी नाल्याची नुकतीच ड्रोनद्वारे छायाचित्रेही घेतली आहेत.
या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने आज शुक्रवारी सकाळी बेळगाव शेतकरी संघटनेचे नेते नारायण सावंत यांची भेट घेतली. तसेच बळ्ळारी नाल्याची समस्या नेमकी काय आहे? आणि बळ्ळारी नाल्याची सध्या परिस्थिती काय आहे? यासंदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी बोलताना सावंत यांनी सांगितले की, गेल्या 20 वर्षांपूर्वी जेंव्हा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाला प्रारंभ झाला. त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यातमध्ये बळ्ळारी नाल्याच्या पाण्याच्या निचऱ्याबाबत ही प्रश्न उपस्थित झाला होता.
बळ्ळारी नाल्याची ही समस्या आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच या नाल्याची साफसफाई करून विकास साधण्यात आला नाही तर पावसाळ्यात नाल्याला येणाऱ्या पुरामुळे बेळगाव शहरासह आसपासच्या शिवारातील शेत पिकांचे मोठे नुकसान होणार आहे हे देखील स्पष्ट केले होते. मात्र त्यावेळी आणि त्यानंतर आजतागायत सदर नाल्याच्या विकासासंदर्भात वारंवार निवेदनात येऊन देखील प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
मागील संपूर्ण कालावधीत आम्ही संबंधित प्रत्येक राजकीय नेत्यांसह बदललेल्या सरकारांसमोर आमची मागणी मांडली आहे. मात्र पाणी कुठे मुरते माहित नाही. कारण आजपर्यंत या नाल्याच्या विकासाकडे सर्वांनीच कानाडोळा केला आहे.
दरवेळी आश्वासनं दिली जातात जेसीबी वगैरे लावून विकास कामाला सुरुवात झाल्याचे भासवले जाते मात्र पुढे प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. बळ्ळारी नाल्याचा विकास तर साधण्यात आलेलाच नाही, उलट त्या विकासाच्या नावावर कोट्यावधी रुपये हडप करण्यात आले आहेत, असा आरोपही नारायण सावंत यांनी केला.
येळ्ळूर पासून मुचंडी पर्यंतचा बळ्ळारी नाला सध्या संपूर्णपणे जलपर्णीने व्यापला असून त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्या जोरदार पावसात या नाल्याचे पाणी पात्रा बाहेर पडून आसपासच्या शेतात घुसले. याला कोण जबाबदार? या प्रश्नाला उत्तर देताना नारायण सावंत याला संपूर्णपणे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी वयाने आता 20 वर्षाची झाली आहे.
तिची पाळमुळं नाल्याच्या पात्रात खोलवर मजबूत रोवली गेली आहेत. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्यातील पाण्याचे स्त्रोत व वेग प्रचंड वाढवून देखील ही जलपर्णी वाहून गेलेली नाही. परिणामी या जलपर्णीमुळे नाल्यातील मुसळधार पावसाचे पाणी अडले जाऊन आसपासच्या सुमारे 2 हजार एकर शेत जमिनीत ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे ही संपूर्ण शेत जमीन गेल्या 15 दिवसांपासून कोणतेही पीक घेण्याच्या योग्यतेची राहिलेली नाही.
बळ्ळारी नाल्याचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून छायाचित्र घेण्याच्या आपल्या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सावंत म्हणाले की, बेळगाव हे एक सुंदर आणि चांगलं शहर आहे. अलिकडे प्रशासन स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हजारो कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र घाण, अस्वच्छता शहराबाहेर नेणारे बळ्ळारी नाला व लेंडी नाला हे जे दोन प्रमुख नाले आहेत, त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. बेळगावातील घाणीचे जोपर्यंत उच्चाटन केले जात नाही तोपर्यंत बेळगाव स्मार्ट होणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे, असे त्यांनी सांगितले.