बेळगाव लाईव्ह विशेष : २०१३ पासून आजपर्यंत बळ्ळारी नाल्याचा विकासाची केवळ चर्चाच होत आहे. या नाल्यातील गाळ, जलपर्णी काढून बाजूने बफर झोनप्रमाणे जागा सोडत परिसरातील शेतीचे पाणी त्यात जाण्यासाठी योजना आखून शेतीचे नुकसान न होता परिसरातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची संकल्पना असली तरी ती आजतागायत प्रत्यक्षात उतरलेली नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या आणि विकास आराखडा बनविण्याच्या घोषणा झाल्या. नाल्याची समस्या कायमस्वरुपी सुटावी, यासाठी प्रयत्न केले जातील, अशी आश्वासने आजवर आलेल्या पालकमंत्र्यांनी दिली.
अधिकाऱ्यांच्या बैठका, प्रशासनाच्या – शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या. मात्र बळ्ळारी नाल्याचे पाणी वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, धामणे, हलगा, बसवन कुडची आदी भागातील शिवारात तुंबल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आजपर्यंत कुणालाच टाळता आले नाही! शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोर्चा, आंदोलन, निवेदनाच्या माध्यमातून मागणी करून देखील राज्य सरकारने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्षच केले आहे.
सध्या सर्वत्र पावसाचे पाणी तुंबण्याची जी समस्या निर्माण होत आहे त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कारणीभूत आहे. दोन्ही बाजूच्या पाण्याचा निचरा करून बंधारे नियोजनबध्द बांधण्यात आलेले नाहीत. जागोजागी धरण झाली आहेत. त्यामुळे सध्याच्या पावसात महामार्गा लगतच्या प्रत्येक गावांमध्ये पाण्याची फूग होत आहे.
त्याचप्रमाणे पाणी निचऱ्याची सोय नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर देखील बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेले पहावयास मिळत आहे. यात भर म्हणून कांही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून बेळगाव ते कोल्हापूर हा दोन तासाचा प्रवास सध्या साचलेल्या पाण्यामुळे जवळपास चार तासाचा होऊ लागला आहे. हीच परिस्थिती बेळगावहून सातारा, कराड, पुणे या ठिकाणी जाताना किंवा येताना होत असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर साचलेले पाणी आणि रस्त्याच्या विकास कामामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर तासंतास वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ येत आहे. अलीकडेच बेळगावातील पुण्याला गेलेले कांही लोक पुन्हा परत येत असताना सातारा ते कोल्हापूर पर्यंत येण्यासाठी जवळपास चार ते पाच तास लागले. रस्त्यावर साचलेले पाणी, रस्त्याचे काम परिणामी होत असलेली वाहतुकीची कोंडी यामुळे या लोकांना सातारा ते बेळगाव प्रवास करण्यासाठी १२ ते १४ तास लागले.

आता यापुढे उपरस्ते करताना ठीकठिकाणी जर बंधारे घातले तर पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. बेळगावचे उदाहरण घ्यायचे झाल्यास पाणी निथर्याकडे दुर्लक्ष करून हलगा -मच्छे बायपास झाला तर त्याच्या उंचीमुळे बळारी नाल्याचे पाणी जुन्या बेळगाव आणि वडगावमध्ये शिरणार आहे. हे टाळायचे असल्यास बायपासच्या ठिकाणी पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशी सोय केली गेली पाहिजे. एकंदर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपरोक्त समस्यांचा अभ्यास करून त्यावर योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे. तसेच लोकांचा प्रवास कोणतीही समस्या निर्माण न होता वेगाने तसेच सुलभ व सुरक्षित होईल या दृष्टीने रस्त्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे.
बळ्ळारी नाला योजना २०१० साली बंद पडलेली आहे. योजना पूर्णत्वास आल्यास बेळगावसह चार तालुक्यातील १४७८६ हेक्टर प्रदेशातील जमीन ओलीताखाली येणार आहे. २००८ साली बळ्ळारी नाला योजनेची घोषणा करण्यासह शासनाने त्यासाठी अनुदानही मंजूर केले होते. त्यानुसार वनखात्याच्या अखत्यारितील २६९.४७ हेक्टर जमीन घेऊन त्याबदल्यात अन्यत्र वनखात्याला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासह अनेक शेतकऱ्यांनी कालव्यासाठी स्वतःहोऊन जमीन दिली होती.
त्यामुळे दोन वर्ष हे काम चालले. मात्र २०१० साली वनखात्याकडून हस्तांतरीत होणारी जमिनीची प्रक्रिया लांबणे, अनुदानाची कमतरता आदी कारणांमुळे योजना ठप्प झाली. पुराचा शेतकऱ्यांना फटका बेळगावात बळ्ळारी नाला परिसरातील अनेक शेतकरी नाल्याच्या पाण्यावर भात, कोथिंबीर व भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. त्यांना ही योजना फायदेशीर ठरु शकते. परंतु, अतिक्रमणामुळे पाणी अडत असल्याने दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.





