बेळगाव लाईव्ह:म्हैसूर प्रयोगशाळेने 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत बेळगाव शहराच्या कांही भागात घातलेले पाण्याचे पाइप निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल दिला आहे.
परिणामी संबंधित ठिकाणी नवी व दर्जेदार जलवाहिनी घालण्याची नामुष्की एल अँड टी कंपनीवर ओढवली आहे. तथापि त्यासाठी पुन्हा खोदाई करावी लागणार असल्यामुळे संबंधित विभागाच्या नगरसेवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मात्र कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाच्या म्हणण्यानुसार जेथे निकृष्ट जलवाहिनी घातली आहे ती काढली जाणार नाही. त्या जलवाहिन्याच्या बाजूलाच नवी जलवाहिनी घातली जाईल. निकृष्ट दर्जाच्या जलवाहिनीची समस्या फक्त बेळगाव पुरती मर्यादित नाही तर हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा येथे देखील ही समस्या आढळून आली आहे.
ज्यामुळे 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीला विलंब होत आहे. सुदैवाने, सदोष पाइपलाइनला अद्याप कोणतेही नळ जोडलेले नाहीत. आता नवीन पाइपलाइन घातल्यानंतरच नळ कनेक्शन दिले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असले तरी यामुळे प्रकल्पाला आणखी विलंब होणार आहे.
योजनेसाठी टाकलेल्या कांही एचडीव्ही पाइपलाइन निकृष्ट दर्जाच्या असल्याची पुष्टी करणारे कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एल अँड टी कंपनीने 2021 मध्ये सुरू केलेल्या 24 तास पाणी योजनेला आता लक्षणीय विलंब होत आहे.
सदर योजना संपूर्ण शहरात सक्रिय करण्याच्या दृष्टीने नवीन जलवाहिनी घालण्यासाठी ठिकठिकाणी खुदाई केली आहे. मात्र, जलवाहिनी घातल्यानंतर रस्ता पूर्ववत (रेस्टोरेशन) करण्याचे काम कंपनीने योग्य पद्धतीने केलेले नाही अशी तक्रार आहे.
याच कारणासाठी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ या समस्येकडे लक्ष देण्याचे आवाहन आमदार अभय पाटील यांनी केले आहे.