Tuesday, December 24, 2024

/

तरुणांच्या हुल्लडबाजीला आवर घालण्यासाठी यंदाही वर्षा पर्यटनावर बंदी?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : नैसर्गिक संपत्तीचा वारसा लाभलेल्या बेळगावमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. बेळगाव सह बेळगावच्या सीमेवरील अनेक पर्यटन स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.

मात्र गेला काही वर्षात घडलेल्या अनुचित घटनांमुळे जिल्हा प्रशासनाने विविध पर्यटन स्थळांवर काही वर्षांपासून बंदी घातली आहे. केवळ बेळगाव जिल्हा प्रशासनच नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानेही काही पर्यटन स्थळांवर बंदी घटली आहे. धबधबे पाहण्याचे निमित करून हुल्लडबाजी वाढल्याचे प्रकार दिसून येत असून मागील काही वर्षांत हे प्रकार आणखीन वाढले आहेत. पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने अनेकजण पावसाळी पर्यटनावर भर देणार आहेत. मात्र, दोन वर्षे वन खाते आणि जिल्हा प्रशासनाकडून वर्षा पर्यटनावर बंदी घातल्याने यंदाही ती कायम असणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नदी-नाल्यांची खळखळ… ओसंडून वाहणारे धबधबे… सर्वत्र दिसणारी हिरवळ आणि गर्द झाडी… यामुळे वर्षा पर्यटन हे प्रत्येकाला आवडते. मात्र पर्यटनस्थळांच्या ठिकाणी होणारी हुल्लडबाजी, सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालणे आदी प्रकारांमुळे पावसाळ्यातील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली जात आहे.

गोकाक, गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी, सुरल येथील वझर धबधबा, सडा धबधबा, चिखलेपारवाड रस्त्यावरील सवतुरा धबधबा, मानजवळील सिम्बॉला वझर, हुळंदजवळ तळीचा वझर, पारवाड येथील देऊची न्हय धबधबा, कॅसलरॉक दूधसागर धबधबा, जांबोटी वज्रपोहा, महिपाळगडाजवळील सुंडी धबधबा, ढोलगरवाडीजवळील सुंडी धबधबा, हिडकल डॅम यासह चोर्ला घाट, जांबोटीजवळील हब्बनहट्टी, तिलारीनगर येथील स्वप्नवेल पॉईंट, तिलारी घाटमाथा, ग्रीन व्हॅली, दोडामार्गजवळ मंगेली, आजरा रामतीर्थ धबधबा हे बेळगाव आणि बेळगाव च्या आसपास असणारी काही वर्षापर्यटनाची स्थळे आहेत.

पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर वाहने बेशिस्त लावणे, वाहनात बसूनच मद्यपान करणे, रस्त्यावर वाहने आडवी थांबवून हिडीस गाणी लावून रस्त्यावर धिंगाणा घालणे, धबधब्याला चिकटून सेल्फी काढणे, बेपर्वाईने धबधब्याच्या पुढे उभे राहून कसरती करणे, इतर नागरिकांची हुज्जत घालणे यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाण्याचा नेमका अंदाज येत नसल्याने, तसेच मद्यधुंद अवस्थेत बुडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना गेला काही वर्षात वाढल्या आहेत.

दूधसागर धबधब्यात बुडणाऱ्यांची संख्या वाढल्याने गोवा वन विभागाने पाच वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी बंद केला. तर आंबोली धबधब्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी वाढल्याने पोलिस कारवाई केली जात आहे.

खानापूरमधील शिंबोळी धबधब्याच्या डोहात २०२२ ला बुडून तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर धबधबा परिसरात प्रवेश करण्यास निर्बंध घातले आहेत. सलग दोन वर्षे हे निर्बंध कायम राहिले असून यंदा हे निर्बंध राहणार का, हे पाहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.