बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर आज गोकाक शहरातील गृहकचेरीत सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयासंदर्भात त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयामागे काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेते तसेच मतदारांचा मोठा वाटा आहे. प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी देऊन वरिष्ठ नेत्यांनी विश्वास टाकला.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील विकास प्रकल्प, हमी आणि गेल्या 30 वर्षांपासून आम्ही जनतेची सेवा केल्याने प्रियांका जारकीहोळी यांचा विजय शक्य झाला आहे.
मतदार आता सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. पक्ष, व्यक्ती, विकास या गोष्टी लक्षात घेऊन प्रियांका जारकीहोळी यांना जनतेने कौल दिला आहे. चिक्कोडी लोकसभा मतदार संघात २ लाख मताधिक्क्याने काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वास होता. परंतु आपल्याच पक्षातील काही लोकांनी जाणीवपूर्वक आपल्याच पक्षाची बदनामी करून पक्षविरोधी काम केले आहे. निवडणुकीत विरोधक डावपेच आखतात मात्र यावेळी आपल्याच पक्षातील नेत्यांनी आपल्याविरोधात अपप्रचार केला यामुळे काँग्रेसला केवळ १ लाख मतांच्या फरकाने विजय साधता आला. पुढील निवडणुकीत मात्र २ लाख मतांच्या फरकानेच विजयी होऊ असा विश्वास मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.