बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात फिरणाऱ्या लोकांसाठी आणखी शौच सुविधा होणार असून तब्बल नऊ ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार आहेत.
महापालिका सभागृहात गुरुवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरात नव्याने नऊ ठिकाणी सामूहिक स्वच्छतागृहे उभारण्याचा ठराव संमत करण्यात आला. शहरातील विविध भागात ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहे.
शहरात नऊ ठिकाणी नव्याने स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. पण खासबाग येथे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने मागणी करूनही जुनी स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील भाजी विक्रेत्यांना त्रास होत आहे त्यांच्याकडून कर आकारला जातोय पण महापालिका त्यांना कोणतेही सुविधा देत नाही त्यामुळे एक तर त्यांच्याकडून कर आकारला जाऊ नये, अन्यथा त्या ठिकाणचे स्वच्छतागृह दुरुस्त करण्यात यावे, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी सभागृहात केली.
या ठिकाणी होणार नऊ शौचालये
महापालिकेकडून मारुती गल्ली यरमाळ रोड, वड्डर छावणी, लाल तलाव अनगोळ, मारुती गल्ली खासबाग, सपना हॉटेल शहापूर, बेळगाव वन अशोक नगर, कसाई गल्ली, महापालिकेची जुनी इमारत, बॅरिस्टर नाथ चौक चांभारवाडा या ठिकाणी नव्याने स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.
नगरसेवक रवी साळुंखे महापालिका बैठकीत बोलताना म्हणाले खासबाग येथे दर रविवारी मोठा बाजार भरत या बाजारात 20 ते 25 हजार लोक सहभागी होत असतात. त्याचे व्यापार करणाऱ्या भाजीविक्रेत्यांकडून महापालिका कर आकारते. पण त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना कोणत्याही प्रकारे सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. परिसरात असलेल्या स्वच्छतागृहाची दुरावस्था झालेली आहे.
हे स्वच्छतागृह दुरुस्त करावे यासाठी आपण सातत्याने मागणी केली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता शहरात नव्याने 9 स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. पण हे स्वच्छतागृहे उभारण्याआधी आता अस्तित्वात असलेल्या आणि दुरावस्थेत असलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी.
खासबाग बाजारात जर स्वच्छतागृह उपलब्ध करून देता येत नसेल तर महापालिकेने व्यापाऱ्यांकडून कर आकारणी करू नये, अशी जोरदार मागणी त्यांनी लावून धरली. नगरसेवक साळुंखे यांच्या मागणीला विरोधी गटानेही पाठिंबा दिला. त्यामुळे महापौर सविता कांबळे यांनी खासबाग बाजारपेठेतील स्वच्छतागृहांची पाहणी करून त्या ठिकाणी लवकरच दुरुस्ती काम हाती घेण्यात येईल असा आदेश बजावला.