बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यापुरते मर्यादित असलेले जारकीहोळी राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावता बजावता आता देशाची राजधानी दिल्लीपर्यंत विस्तारले गेले आहेत.
गोकाक ते यमकनमर्डी, चिक्कोडी आणि आता थेट दिल्लीत झेपावलेल्या जारकीहोळींनी राजकारणातील नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे.
बेळगावच्या राजकारणातील किंगमेकर आणि राज्याच्या राजकारणातील महत्वाचा घटक म्हणून परिचित असणारे जारकीहोळी कुटुंबाचे प्रमुख सूत्रधार सतीश जारकीहोळी यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी गोकाक हुन बेळगाव शहराच्या राजकारणात प्रवेश घेतला होता. मात्र जारकीहोळी कुटुंबाचा ‘टर्निंग पॉइंट’ असलेल्या बेळगावमध्येच आपला राजकीय जम बसवून सतीश जारकीहोळी यांनी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावर ताबा मिळवला.
प्रियांका जारकीहोळी यांना चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवून विजयी करण्यामागे असलेला ‘मास्टरमाईंड नेता’ राज्याच्या राजकारणातून थेट राष्ट्रीय राजकारणात प्रवेश घेत आहे. सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून शपथ घेतली. जारकीहोळी कुटुंबातील नवीन पिढी थेट राष्ट्रीय राजकारणात उतरली आहे.
बेळगाव जिल्ह्यात जारकीहोळी, कत्ती, सवदी, कोरे, जोल्ले हे राजकारणातील महत्वाचे पैलू म्हणून ओळखले जातात. या कुटुंबातील कत्ती आणि जारकीहोळी यांची दुसरी पिढी राजकारणात उतरलेली असून कत्ती घराण्यातील निखिल हे कत्ती हे हुक्केरी मतदारसंघातून आमदार म्हणून काम करत आहेत.
तर जारकीहोळी कुटुंबातील प्रियांका जारकीहोळी यांनी थेट लोकसभेत एंट्री घेत देशाच्या राजकारणात जारकीहोळी कुटुंबाचे नाव समाविष्ट केले आहे. शिवाय सर्वात कमी वयाच्या खासदारांपैकी दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या प्रियांका जारकीहोळी यांना बेळगावसाठी मुद्दा मांडण्याची संधी मिळाली आहे.
यामुळे बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी, तरुण राजकारणी म्हणून नव्या दमाने राजकारणाचे डावपेच मांडावेत आणि बेळगावचा नावलौकिक वाढवावा, अशी आशा व्यक्त होत आहे.