बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टातील प्रलंबित कामे आणि इतर सर्व समस्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लावू त्यासाठी शिष्टमंडळाने पुन्हा जुलै महिन्यात मुंबईला यावे असे आश्वासन सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शंभूराज देसाई यांची भेट घेतली यावेळी देसाई यांनी वरील आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र – कर्नाटकाच्या सीमेवरील शिनोळी या गावात शेतकऱ्यांच्या मालासाठी निर्यात साठा केंद्र स्थापन करावे तसेच शिनोळी येथील सीमाकक्षाचे उद्घाटन त्वरित करण्यात यावे, अशा मागण्या करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सीमासमन्वयक मंत्र्यांकडे निवेदन सादर केले.
म. ए. समिती कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली महादेव पाटील, सागर पाटील, जयराम मिरजकर यांच्या शिष्टमंडळाने सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन सादर केले.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर शिनोळी येथे निर्यात साठा केंद्र स्थापन करावे, जेणेकरून बेळगाव, खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला देशविदेशात पाठविण्यासाठी फायदा व्हावा. जवळच असलेल्या मोपा या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून शिनोळी निर्यात साठा केंद्रातून मालाची निर्यात करण्यास मदत होईल, तसेच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल या अनुषंगातून सदर मागणी करण्यात आली आहे त्यावर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आम्ही प्रपोजल देऊ असे शंभूराज यांनी सांगितले.तसेच आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेल्या शिनोळी येथील सीमा कक्षाचे उद्घाटन करण्यात यावे त्यावर देखील लवकरच कारवाई होईल असेही सांगितले.
पुढील आठवड्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनात बेळगावच्या सर्व समस्या मार्गी लावू यासाठी अधिवेशनात शिष्टमंडळाने यावे असेही सूचित केले.