Saturday, September 28, 2024

/

लखन जारकीहोळी विधान परिषदेत काँग्रेसच्या पाठीशी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :विधानपरिषदेमध्ये आपले संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात काँग्रेसने प्रभावशाली जारकीहोळी कुटुंबातील एका अपक्ष सदस्याचा पाठिंबा मिळविला आहे.

जारकीहोळींच्या निकटच्या नेत्यांनी सांगितले की, गोकाकच्या या कुटुंबातील सर्वात धाकटा भाऊ लखन जारकीहोळी, जे 2022 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले होते, त्यांनी परिषदेत लोकाभिमुख विधेयके आणि दुरुस्त्या मंजूर करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या 3 जूनच्या निवडणुका काँग्रेससाठी महत्त्वाच्या होत्या. कारण याआधी विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या सात जागांसह सर्व सहा जागा जिंकून पक्षाला बहुमत मिळू शकले असते. तथापि पक्ष त्यात कमी पडला आणि या बहुमताच्या कमतरतेमुळे महत्त्वाची विधेयके वरच्या सभागृहात एनडीए भागीदारांच्या विरोधामुळे अडकून पडली आहेत. यापुढे विधानसभेच्या रचनेत बदल करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला 2026 च्या मध्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विशेषत: सात जागांची मुदत 30 जून 2026 रोजी समाप्त होणार आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त पाच नामनिर्देशित सदस्यांचा कालावधी 21 जुलै 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे.

सध्या 75 सदस्यांच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे 34 जागा, तर एनडीएकडे 38 जागा असून त्यापैकी 30 भाजप आणि 8 निजदकडे आहेत. जगदीश शेट्टर यांच्या राजीनाम्यानंतर एक जागा रिक्त राहिली आहे. काँग्रेसने बसनागौडा बादर्ली यांना उमेदवार म्हणून नियुक्त केले आहे. याशिवाय लखन जारकीहोळी आणि अध्यक्ष बसवराज होराट्टी यांची परिषदेत एक जागा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेले विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास पुजारी यांच्या राजीनाम्यामुळे दक्षिण कन्नडमधील त्यांची जागा रिक्त झाली आहे. बादर्लीच्या समावेशासह काँग्रेसच्या जागांची संख्या 35 इतकी वाढेल. तसेच जानेवारी 2025 मध्ये निजद उमेदवार के. ए. थिप्पेस्वामी निवृत्त झाल्यावर त्यांना आणखी एक जागा मिळण्याची शक्यता आहे. पुजारीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने दक्षिण कन्नड जागा काबीज केली तर त्यांची संख्या 37 जागांवर पोहोचेल आणि वरच्या सभागृहातील निर्णयांवर जारकीहोळी प्रभुत्व मिळवतील.

लखन जारकीहोळी पाच भावांमध्ये सर्वात लहान असून बेळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ते राज्य विधान परिषदेवर निवडून आले आहेत. त्यांनी सरकारला सशर्त पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. ज्यामुळे त्याचे ठराव पारित करण्यात मदत होणार आहे. ताज्या घडामोडीबाबत माहिती देताना लखन जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेसने मला पक्षात येण्याचे आवाहन केले होते, परंतु मी आपला निर्णय जाहीर केलेला नाही. पक्षात जाण्यापेक्षा स्वतंत्र सदस्य म्हणून राहून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अधिक काम करता येईल. “मी फक्त लोकांची विधेयके आणि दुरुस्त्या मंजूर करण्यासाठी काँग्रेस सरकारला पाठिंबा देईन आणि मतदान करीन, असे लखन पुढे म्हणाले.

काँग्रेसचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी लखन यांच्याशी आपल्या पक्षाच्या संपर्काची पुष्टी केली. लखन यांनी आवश्यकता भासेल तेंव्हा पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्हाला तीन जागा जिंकण्याचा विश्वास आहे आणि जर लखन आमच्यासोबत उभे राहिले तर आम्ही परिषदेत बहुमत मिळवू,” असा विश्वास व्यक्त करून या बहुमतामुळे सरकारला विधेयके आणि दुरुस्त्या मंजूर करण्यात मदत होईल, असेही ते म्हणाले.

Lakhan jarkiholi
Lakhan jarkiholi

जारकीहोळीच्या पाच भावांमध्ये लखन हे सर्वात लहान आहेत. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात हे कुटुंब विभागले गेले आहे. रमेश आणि भालचंद्र हे भाजपचे अनुक्रमे गोकाक आणि अरभावी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डी येथील काँग्रेसचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सतीश यांची मुलगी प्रियांका बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी मतदारसंघातून काँग्रेस खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

जारकीहोळी बंधू कर्नाटकच्या राजकारणात सुमारे दोन दशकांपासून प्रभावशाली आहेत. त्यांनी गेल्या 10 वर्षांत विविध सरकारांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील निजद-काँग्रेस सरकार कोसळवण्यात आणि बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर आणण्यात या कुटुंबाचा मोठा वाटा होता.

News source: Hindusthan times

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.