बेळगाव लाईव्ह : नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पाहता परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर चौकशी होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करा, अशी मागणी इंडियन युथ काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
आज बेळगावमध्ये इंडियन युथ काँग्रेसच्या वतीने नीट परीक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले आहे. इंडियन युथ काँग्रेसचे डॉ. शेख सोहेल आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन सादर केले
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नीट परीक्षा ही व्यावसायिक परीक्षा सिस्टिम ऑफ एलिमिनेशनवर आधारित आहे. या परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
चालू वर्षाच्या नीट परीक्षेच्या निकालात अनियमितता झाली असून एकाच केंद्रातून ६७ विद्यार्थ्यांना ७१८,७१९ गुण मिळाले आहेत. हि बाब देशातील विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असून याला जबाबदार असणाऱ्या परीक्षा व्यवस्थापन मंडळाची चौकशी व्हावी.
या परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर होणार होता. मात्र १० तारखेलाच हा निर्णय जाहीर झाल्यामुळे अनेक शंका निर्माण होत असून या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.