बेळगाव लाईव्ह :गत लोकसभा निवडणुकीत समितीला म्हणावे तितके यश मिळाले नसले तरी सीमा भागाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकट करण्याचा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत घेण्यात आला.
यावेळी निवडणुकीतील पराभव आणि इतर अपयशाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक रविवारी संध्याकाळी मराठा समाजाचे मंदिर जत्ती मठ येथे झाली . या बैठकीच्या अध्यक्षाठणी बीओ येतोजी होते.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती कमी पडली. समितीच्याच अनेक नेत्यांनी राष्ट्रीय पक्षांचा प्रचार केला त्यामुळे मराठी भाषिकात संभ्रम निर्माण झाला यापुढे असा दगा फटका होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
मराठी पाठ्यपुस्तकांत अनेक चुका आहेत शिक्षक भरतीत गोंधळ चालला आहे याशिवाय सीमा प्रश्नाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने देण्यात आला आहे त्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून याबाबत जाब विचारावा अशाही सूचना करण्यात आल्या. निवडणुकीच्या काळात जुन्या नेते आणि कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यामुळे अपयश आले असे मत काहींनी व्यक्त केले.
महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे वैद्यकीय मदत आणि इतर बाबी देऊन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये असेही विनंती यावेळी करण्यात आली. तर समाजाच्या हितासाठी महाराष्ट्राकडून येणाऱ्या मदतीचेही स्वागत करण्यात यावे आणि सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात चालना मिळेल यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा असेही काहींनी मत व्यक्त केले.
या निवडणुकीत समितीला अपयश येण्यामागे आपणच कारणीभूत आहोत त्यामुळे या पुढील काळात सर्वांनी एकोफ्याने काम करावे समितीचे संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया सध्या असलेल्या कार्यकारिणीत अजून सदस्यांची भर घालूया असाही सूर बैठकीत निघाला.