बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर, धामणे मार्गावरील परिवहन बस चालक व वाहकांच्या मनमानीमुळे शेतकरी महिलांना होणाऱ्या त्रासासंदर्भात निगिल योगी रयत सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांसह म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आज परिवहन मंडळाच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून जाब विचारला. तसेच संबंधित बसचालक व वाहकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
येळ्ळूर, धामणे मार्गावरील परिवहन बस चालक व वाहक वाटेत शिवाराच्या ठिकाणी विनंती थांबा न घेता थेट वडगाव ते येळ्ळूर -धामणे, येळूर -धामणे ते वडगाव बस हाकत आहेत. त्यामुळे शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी महिलांची कुचंबना होऊन त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येत नसल्यामुळे आज सोमवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर आणि निगिल योगी रयत सेवा संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी परिवहन मंडळाच्या जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच येळ्ळूर, धामणे मार्गावरील परिवहन बस चालक व वाहकांच्या मनमानीमुळे शेतकरी महिलांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागत आहे याची माहिती दिली.
मनमानी करणाऱ्या संबंधित बस चालक व वाहकाला तात्काळ समज देऊन विनंती थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबवण्याची सक्त सूचना करावी. अन्यथा त्यांना चांगला धडा शिकवण्यात येईल, असा इशारा यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी दिला. शेतकरी नेत्यांची तक्रार ऐकून घेऊन चर्चेअंती वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे ठोस आश्वासन दिले.
याप्रसंगी नेगील योगी रयत सेवा संघाचे राज्याध्यक्ष रवी पाटील, बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे, बैलहोंगल तालुका अध्यक्ष बिस्टप्पा गोडची, यल्लाप्पा कानप्पवर, मारुती कोडळी आदीसह परिवहन मंडळाचे संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.
परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रवी पाटील यांनी सांगितले की, आज आम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात बेळगाव जिल्हाधिकारी आणि परिवहन मंडळाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. शेतकरी महिलांना शेतीच्या कामासाठी दररोज दूरवर असलेल्या आपल्या शेताकडे ये -जा करावी लागते त्यासाठी त्यांना परिवहन मंडळाची बससेवा सोयीची पडते. मात्र येळ्ळूर, धामणे मार्गावरील बसेस विनंती करून देखील शेतकरी महिलांसाठी न थांबता थेट निघून जात असल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. पूर्वी महिलांसाठी तिकीट असताना बसेस विनंतीवरून थांबत होत्या. मात्र महिलांसाठी बस प्रवास मोफत झाल्यापासून सदर मार्गावरील बस चालक व वाहकाची मनमानी वाढली आहे. यासाठी संबंधित चालक व वाहकांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी आम्ही आज परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटलो. तेंव्हा त्यांनी चौकशी करून शेतकरी महिलांसाठी विनंतीवरून बस थांबवण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे.
याखेरीज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनाही आम्ही निवेदन दिले असून त्याद्वारे मुख्यमंत्र्यांसमोर विविध मागण्या मानले आहेत कारण विद्यमान राज्य सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष एक महिना झाला आहे. मात्र तरीही जनतेला दिलासा देण्याऐवजी बॉण्डचे दर वाढवले आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी बियाणे, मद्य, डिझेल वगैरेंचे दर वाढवले आहेत.
या सरकारला मान मर्यादा असेल तर त्यांनी जनतेसाठी अत्यावश्यक असलेल्या गॅरंटी योजना वगळता इतर गॅरेंटी योजना तात्काळ बंद कराव्यात त्याऐवजी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसह गरीब जनतेचे कल्याण करावे त्याचप्रमाणे सरकारने बियाणे, डिझेल आदी शेतकऱ्यांशी संबंधित गोष्टींची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी आमची मागणी आहे असे रवी पाटील यांनी सांगितले.