Thursday, January 9, 2025

/

बीम्स प्रशासनाची मग्रुरी कि मराठीद्वेष?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील प्रशासनाला मराठीद्वेष आहे हे जगजाहीर आहे. परंतु एखाद्या अधिकारी पातळीवरच्या जबाबदार व्यक्तीने नको त्या ठिकाणी मराठीद्वेष बाळगून एखाद्याच्या मृत्युशय्येवरील परिस्थितीशी खेळ करणे कितपत योग्य आहे? कायदा, प्रशासन, सुव्यवस्था या सर्व गोष्टी प्रत्येकासाठी समान असतात, याचे काही नियम असतात.

परंतु या नियमांना तिलांजली देत केवळ कन्नड अभिमान बाळगून एखाद्याच्या जीवाशी येईपर्यंत मग्रूर राहणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न बेळगावमध्ये आज उपस्थित केला जात आहे.

मंगळवार दि. १८ जुलै रोजी बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावर हिंडगाव फाटा ते गवसे फाटा दरम्यानच्या वळणावर नियंत्रण सुटलेल्या भरधाव मोटरसायकलने समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात बेळगावचे दोन युवक ठार झाले. मलिक खतालसाब मुजावर (वय 22, रा. मोदगा, ता. बेळगाव) आणि दौलत खतालसाब मोमीन (वय 22, रा पंतबाळेकुंद्री, ता. बेळगाव) अशी अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी युवकांची नावे आहेत.

कानूर बुद्रुक येथून सिमेंटची पोती उतरवून एक मालवाहू टेम्पो गडिंग्लजच्या दिशेने जात होता. त्यावेळी मलिक मुजावर व दौलत मोमीन हे दोघे मित्र मोटरसायकल वरून आंबोलीकडे निघाले होते. गवसे -हिंडगाव फाट्या दरम्यानच्या वळणावर मलिक याचा अचानक मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या टेम्पोला त्यांची जबरदस्त धडक बसली. अपघातात मलिक जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झालेल्या दौलत याचे उपचाराचा फायदा न होता बेळगाव येथील रुग्णालयात निधन झाले. चंदगड पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद झाली. सदर तरुण आंबोली येथे पर्यटनासाठी जात होते त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

अपघात घडला यापेक्षाही अपघातानंतर बीम्स प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अपघातग्रस्त तरुणांच्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप सोसावा लागला. आधीच कुटुंबांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर आणि त्यात केवळ मराठी भाषेतून मिळालेली एफआयआर यामुळे बीम्स प्रशासनाने शवविच्छेदनासाठी पुढील कारवाई केली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पुढील कारवाई केली असती तर कदाचित एकाचा जीवही वाचला असता अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.Bims

सदर अपघात महाराष्ट्राच्या हद्दीत घडल्याने तेथील स्थानिक पोलिसांनी मराठीतून अपघाताची नोंद केली. पुढील कारवाईसाठी मराठी भाषेतील कागदपत्रे पाठविण्यात आली. मात्र बेळगावमध्ये आणखी एका गंभीर जखमी अवस्थेतील तरुणावर उपचार करण्यासाठी ना रुग्णवाहिका उपलब्ध झाली ना शवविच्छेदनासाठी वेळेत कागदपत्रे उपलब्ध झाली. तब्बल २४ तास उलटूनही शवविच्छेदन करण्यात आले नाही, आणि ते केवळ मराठी भाषेत असलेल्या एफआयआरमुळे!

बीम्स प्रशासनाच्या या मग्रुरीमुळे दुःखात बुडालेल्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. बीम्स मधील एका महिला अधिकाऱ्याने हि मग्रुरी दाखविली असून जर सदर महिला कर्मचाऱ्याने बेगडी भाषाप्रेमी बाजूला सारून आपले कर्तव्य चोखपणे बजावले असते तर कदाचित एका युवकाचे प्राण वाचले असते अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून बीम्स प्रशासनाच्या या कारभाराविरोधात ताशेरे ओढण्यात येत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.