Friday, November 15, 2024

/

पावसाळ्याच्या पूर्वतयारीबाबत महापौरांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मान्सूनला सुरुवात झाली असून गेला आठवड्याभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पहिल्याच पावसात अनेक नागरी समस्यांनी डोके वर काढले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या समस्यांमध्ये आणखीन भर पडू नये, नागरिकांना अडचणी उद्भवू नयेत यासाठी आज बेळगाव महानगर पालिका सभागृहात नगरसेवक, स्थायी समिती सदस्यांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सविता कांबळे या होत्या. यावेळी बोलताना सविता कांबळे यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना तसेच खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. शहरातील विविध भागात गटारींमधील गाळ न काढल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे आढळून आले आहे.

परिणामी हे पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा अधिकाधिक त्रास सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना जाणवतो. शिवाय नाल्यांमधील गाळ तसाच राहिल्याने नाला परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही फटका बसतो. यामुळे गटारी आणि नाल्यांमधील गाळ काढून टाकावा, ड्रेनेजसंबंधी तक्रारी आल्यास दुरुस्तीसाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध असावेत यासह प्रामुख्याने शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना महापौरांनी केल्या.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही समस्या उद्भवून जनतेला अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी हेस्कॉम अधिकारी, पाणी पुरवठा मंडळ अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी यासह सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे महापौर म्हणाल्या.City corporation

या बैठकीत करसवलतीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या मागणीनुसार कर भरण्याची मुभा वाढवून देण्यात आली असून या सवलतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर सविता कांबळे यांनी केले.

यानंतर बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त पी.एन.लोकेश यांनी पावसाळ्यात उदभवणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात चर्चा केली. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेत सातत्याने बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही दिली.

यावेळी नगरसवेकांनीही अनेक समस्या मांडत समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली. बैठकीला महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.