बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर विकास प्राधिकरणाची बैठक आज तब्बल तीन महिन्यानंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजिण्यात आली होती.
या बैठकीत शहराच्या विकासासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कणबर्गी लेआऊट, बुडा भ्रष्टाचार, वनविभागात होणाऱ्या नागरी वस्तीचे कामकाज याबाबत चर्चा झाली.
कणबर्गी लेआऊटसंदर्भात अद्याप भूसंपादन बाकी आहे. येथील काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली असून अद्याप यावर कामकाज सुरु आहे. गेल्या १५ वर्षांपासून येथील लेआऊटचे कामकाज सुरु आहे. मात्र काही नागरिकांनी आक्षेप घेतल्यामुळे हे कामकाज अर्धवट राहिले आहे.
येत्या काही दिवसात त्याठिकाणच्या कामकाजाला सुरुवात होईल, अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी दिली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सतीश जारकीहोळी म्हणाले, बुडा भ्रष्टाचाराप्रकरणी शासकीय पातळीवर तपास सुरु आहे. या प्रक्रियेला उशीर लागण्याची शक्यता आहे. परंतु तपासादरम्यान दोषी आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
या बैठकीला बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बुडा आयुक्त शकील अहमद, आमदार असिफ (राजू) सेठ, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.