बेळगाव लाईव्ह :श्री अमरनाथ यात्रेला येत्या 29 जून रोजी प्रारंभ होत असून या यात्रेत सहभागी होण्यासाठी बेळगावमधील महिला व पुरुष असे एकूण 85 शिवभक्त नुकतेच अमरनाथला रवाना झाले आहेत.
बेळगावमधील 85 शिवभक्त गेल्या शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावरून अमरनाथच्या दिशेने रवाना झाले आहेत.
येत्या 29 जून रोजी श्री अमरनाथ यात्रा असल्यामुळे हे सर्व शिवभक्त पुढील 17 दिवस त्या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. बेळगावहुन रवाना झालेले हे शिवभक्त काल सकाळी दादर मुंबईला पोहोचले असून तेथून ते जम्मूतावी येथे जाणार आहेत.
जम्मू जवळील माता वैष्णवी देवीचे दर्शन घेऊन पुढे शिवकोडी गुंफांचे दर्शन घेऊन ते पुन्हा माघारी जम्मूला परतणार आहेत. त्यानंतर जम्मू ते पहलगाम, चंदनवाडी मार्गे अमरनाथ गुंफांचे दर्शन घेऊन बालटाळ येथे मुक्काम करतील.
त्यानंतर हरिद्वार, अयोध्या, वाराणसी या ठिकाणी भेटी देऊन 6 जुलैला ते परतीच्या प्रवासाला निघून मुंबई मार्गे बेळगावला येतील. या यात्रेचे नियोजन विशाल मिरजकर, श्रीनाथ कोकितकर, अजय हावळ, अमित कंग्राळकर व उमेश बागेवाडी यांनी केले आहे. त्यांच्याकडून दरवर्षी ही यात्रा आयोजित केली जाते.