बेळगाव लाईव्ह :सांबरा येथील सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी गावात श्री महालक्ष्मी यात्रेमध्ये लहान मुलांची खेळणी व इतर साहित्यांची विक्री करण्यास आलेल्या परगावच्या किरकोळ विक्रेत्यांना आज सकाळी पुलाव वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून माणुसकीचे दर्शन घडविले.
गेल्या काही दिवसांपासून सांबरा (ता. जि. बेळगाव) येथे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरली आहे. सदर यात्रा तब्बल 18 वर्षानंतर भरल्यामुळे हजारो भाविक या यात्रेला हजेरी लावत आहे. यात्रेच्या ठिकाणी महादेवनगर येथे परगावहून आलेल्या विक्रेत्यांकडून विविध स्टॉल मांडण्यात आले आहेत.
बंदुकीने फुगे फोडणे, जायंट व्हील सारख्या मनोरंजनात्मक खेळांसह कपडेलत्ते, सौंदर्यप्रसाधने, लहान मुलांची खेळणी, विविध खाद्यपदार्थ वगैरे नाना तऱ्हेचे स्टॉल यात्रा परिसरात मोठ्या प्रमाणात थाटण्यात आले आहेत. आठवडा होत आला या स्टॉलवरील विक्रेते ग्राहकांना खुश करण्यासाठी राबत आहेत.
मध्यंतरी या विक्रेत्यांना पावसाची वक्रदृष्टीही सहन करावी लागली. या बाबी ध्यानात घेऊन सांबरा गावातील सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी सदर विक्रेत्यांना आज शुक्रवारी सकाळी पुलाव वाटप केले. सदर उपक्रमाचा सुमारे 250 जणांनी लाभ घेतला.
माणुसकीच्या दृष्टिकोनातून राबविण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश मुतगेकर, योगेश पालकर, निखिल जत्राटी, सागर बिरोडकर, मोहन हरजी, अजय सुतार, निखिल चिंगळी, जोतिबा मुतगेकर, प्रवीण डूमरकी, सिध्दार्थ सूनगार, सोमनाथ डूमारकी, सागर बेळगावकर, साई मोहन हरजी, श्रेयश मोहन हरजी आदींनी विशेष परिश्रम घेतले