बेळगाव लाईव्ह : संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात ८ दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती मागील आठवड्यात मिळाली होती.
यंदा मान्सूनची हजेरी लवकर लागणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून मान्सूनपूर्व पावसाने बेळगावमध्ये ठिकठिकाणी दमदार आगमन केले आहे. या पार्श्वभूमीवर राकसकोप जलाशय परिसरात झालेल्या पावसामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
गुरुवारी पाणलोट क्षेत्रातील बेळवट्टी, इनाम बडस, मोरब (ता. खानापूर) परिसरात मुसळधार पाऊस झाला. या परिसरात झालेल्या वळीव पावसामुळे पाणीपातळीत अर्धा फूट वाढ झाली आहे.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप परिसरात गुरुवारी सायंकाळी तुरळक प्रमाणात केवळ 4.4 मी. मी. पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळीची 2454.65 फूट इतकी नोंद झाली आहे. मागीलवर्षी याचदरम्यान पाणीपातळी 2452 फूट होती. मागील वर्षापेक्षा अडीच फूट पाणी जलाशयात अधिक असून डेडस्टॉकनंतरचे अजूनही 7 फूट पाणी शिल्लक साठा वापरण्यास योग्य आहे.
1 मे 2024 रोजी जलाशय पाणीपातळी ही 2457.50 इतकी होती. या महिन्यात आतापर्यंत 2.85 फूट पाणी शहराला सोडण्यात आले आहे. या हिशोबाने पाहता अजूनही दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा डेडस्टॉकनंतर उपलब्ध आहे.
तर एक महिनाभर पुरेल इतके पाणी डेडस्टॉकमधून उपसा करता येते त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही.
मागील वर्षी 18 जून 2023 पासून एक विद्युत पंपाचा वापर करत जलाशयाच्या डेडस्टॉकमधील 8 जुलै पर्यंत पाणीउपसा करत शहराला पुरविण्यात आले होते. जलाशय परिसरात या महिन्यात 12 मे रोजी 29.5 मी. मी. 13 मे रोजी 24.9, 15 मे रोजी 26.3 मी. मी., 20 मे रोजी 33.2 मी. मी असा पाऊस झाला आहे. यावर्षी एकूण 150.7 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.