बेळगाव लाईव्ह:कोविडच्या काळात प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करून महामारी कार्यक्षमतेने हाताळली आहे. सहकार्य ही भारतीय संस्कृती आहे. कोविडवर उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी आयसीएमआरचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.
पारंपारिक औषधांत संशोधनाच्या क्षेत्रात संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. देशाला वैद्यकीय क्षेत्रात आघाडीवर नेण्याची जबाबदारी शास्त्रज्ञ, संशोधकांवर आहे. जैवविविधता जतन करून भावी पिढ्यांसाठी पारंपारिक औषध पद्धती जतन करण्यात यावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांनी केले.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिनच्या (आयसीएमआर-एनआयटीएम) 18 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते सोमवारी (ता. 27) बोलत होते.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यावर देशाचे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने सामर्थ्यवान बनून 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन उपराष्ट्रपती धनकड यांनी केले.
भारताची अर्थव्यवस्था एकेकाळी लंडन आणि पॅरिसच्या तुलनेत कमी होती. आता हा देश जगातील पाचवी मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, योगासह आयुष प्रणाली ही भारताची शान आहे. संसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणात पारंपारिक औषधांची भूमिका महत्त्वाची आहे. यामध्ये आयसीएमआरचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी, भारतीय पारंपारिक औषध संस्था ही आयसीएमआरच्या 27 संशोधन संस्थांपैकी एक आहे. कोविड लस विकसित करण्यात संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. आता पश्चिम घाटातील औषधी वनस्पतींचा अभ्यास करून वनौषधी तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपाल थावरचंद गेहलोत, श्रीमती डॉ. सुदेश धनकड, आयसीएमआर बेळगावच्या संचालिका डॉ. सुवर्णा रॉय उपस्थित होत्या. संस्थेच्या सहसचिव अनू नागर यांनी यावेळी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनियांंग, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, आयसीएमआर-एनआयटीएमचे शास्त्रज्ञ व संशोधक सहभागी झाले होते.