बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरव्याप्तीतील मालमत्ता धारकांना ५ टक्के करसवलत देण्यात आली असून या करसवलतीचा लाभ बेळगावमधील मालमत्ताधारक घेत असून करभरणा करण्यासाठी नागरिक उत्साहाने पुढाकार घेत असल्याची माहिती बेळगाव महानगरपालिका महसूल उपायुक्त गुरुनाथ यांनी दिली.
मंगळवारी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त माहिती दिली. २०२३-२४ या सालात बेळगाव महानगरपालिकेने ६२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी ५४.५७ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून एकूण ८८.०३ टक्के करवसुली पूर्ण झाली आहे.
तसेच आगामी वर्षात ८० कोटींचे करवसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून एकूण उद्दिष्टापैकी १९.२३ कोटींची वसुली एप्रिल आणि मे महिन्यात पूर्ण झाल्याची माहिती महसूल उपायुक्तांनी दिली.
२०२३-२४ शाळातील एकूण ७.४२ कोटी रुपयांची थकबाकी असून गतवर्षीच्या तुलनेत करवसुलीत ३ टक्के सुधारणा झाली आहे. २०२४-२५ मध्ये एकूण करवसुलीपैकी एप्रिल महिन्यात १६.९१ आणि मे महिन्यात २.३२ कोटींची वसुली झाली असून एकूण १९.२३ कोटी रुपयांची करवसुली झाली आहे. सुधारित मालमत्ता नोंदणी नियमानुसार ७३ कोटी रुपयांची वाढ झाली असून अद्याप ७.४२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमुळे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने थकबाकी राहिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून पूर्ववत सर्व कर्मचारी सेवेत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता उर्वरित करवसुली वेगाने करण्यात येईल आणि करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात येईल, अशी माहिती महसूल उपायुक्तांनी दिली.
या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांनी बेळगावमधील मालमत्ताधारकांना आवाहन करत स्वच्छ, सुंदर बेळगाव शहरासाठी नागरिकांनी करभरणा करण्याची सूचना केली. या पत्रकार परिषदेला महसूल विभागाचे उपायुक्त गुरुनाथ कडबूर, मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.