बेळगाव लाईव्ह : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने गुरुवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. या निकालानुसार राज्यामध्ये उडुपी जिल्हा अव्वल स्थानावर असून दक्षिण कन्नड जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शिमोगा तिसऱ्या क्रमांकावर असून बेळगाव जिल्ह्याची मात्र सातत्याने घसरण होत चालल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदा सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा दहावी निकाल घसरला असून, यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 77.81 इतका असून 66.49 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामुळे मुली सरस ठरल्या आहेत.गतवर्षाच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी घसरली आहे. गेल्यावर्षी 89.25 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. शिक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी शिक्षण खात्याकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, अपेक्षेनुसार यश आलेले नाही.
मच्छे गावची कन्या व सेंट मेरी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी तनिष्का शंकर नावगेकर हिने 620 गुण (99.20 टक्के) घेऊन जिल्ह्यात तसेच शहरात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर मराठी विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी प्रेरणा प्रकाश पाटील हिने 619 गुण (99.04 टक्के) घेऊन शहरामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
बेळगाव पाठोपाठ चिकोडी जिल्ह्याची घसरण थेट 25 व्या स्थानावर झाली आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्हा १३ व्या स्थानावरून थेट २५ व्या स्थानावर घसरला असून या जिह्यातील 69.82 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. चिकोडी शैक्षणिक जिह्याचा सन 2024 सालातील दहावीचा निकाल 69.82 टक्के लागला असून राज्यात हे स्थान 25 वे आहे.
जिह्यातून एकूण 22,674 विद्यार्थी व 21,470 विद्यार्थिनी अशा एकूण 44,141 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 13,887 विद्यार्थी व 17,254 असे एकूण 31 हजार 141 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुनर्परीक्षा ७ ते १४ जून या कालावधीत
गुरुवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालानंतर कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दहावी पुनर्परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा 7 जून ते 14 जून या कालावधीत होणार आहे.
परीक्षा-1 मध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि विषयांमधील गुण सुधारण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी या परीक्षेला नोंदणी करू शकतात. 7 जून-प्रथम भाषा, 8 जून-तृतीय भाषा, 10 जून-गणित, 12 जून-विज्ञान, 13 जून-द्वितीय भाषा, 14 जून रोजी समाज विषयाचा पेपर होणार आहे.
आकडेवारी :
विभाग परीक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
बेळगाव शहर 8134 6464 79.47
खानापूर 3626 1478 69.14
बेळगाव ग्रामीण 5553 3758 67.68
बैलहोंगल 3970 2421 60.98
सौंदत्ती 5269 3106 58.95
कित्तूर 1609 930 57.80
रामदुर्ग 4066 2243 55.16
एकूण 32,227 21,429 66.४९