बेळगाव लाईव्ह विशेष : बहुजन समाज सण, यात्रा, उत्सव, समारंभात इतका तल्लीन झाला आहे कि आपण या गोष्टी का आणि कशासाठी करतो आहोत? या गोष्टी करण्यामागचा उद्देश काय? हेतू काय? परंपरा काय सांगते? पूर्वजांनी या गोष्टी कशासाठी आखून ठेवल्या आहेत? याचे भान बहुजन समाजाला राहिले नाही. चैत्री यात्रा असो किंवा पंढरीची वारी.. प्रतिवर्षी साजरी करण्यात येणारी माही असो किंवा वार्षिकोत्सव.. या सर्व गोष्टींमागे पूर्वजांनी कल्पिलेल्या गोष्टी नक्कीच आहेत. परंतु अलीकडे परंपरा आणि चालीरीती या केवळ एक ‘इव्हेन्ट’ बनल्या आहेत. बेळगावमध्ये सध्या याच मुद्द्यावरून पंचक्रोशीत चर्चा गाजत आहे.
बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जागृत आणि पुरातन देवस्थान श्री मळेकरणी देवस्थानाच्या यात्रेचा मुद्दा सध्या बेळगावकरांच्या चर्चेचा आणि ऐरणीचा मुद्दा बनला आहे. श्री मळेकरणी देवस्थानात केल्या जाणाऱ्या यात्रेसंदर्भात ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी ऐतिहासिक ठराव केला आणि या ठरावानुसार ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे दोन्ही बाजूनी पडसाद उमटले. एकाबाजूला ग्रामस्थ आणि दुसऱ्या बाजूला भाविक असा संघर्ष जाहीर झालेल्या निर्णयानंतर पाहायला मिळाला. मुद्दा होता तो श्री मळेकरणी देवीला वाहण्यात येणाऱ्या पशुमानाचा!
नवसाला पावणारी जागृत देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या पायाशी अनेक भाविक आपल्या मागण्या घेऊन येतात. या मागण्या मान्य करण्यासाठी देवीला नवस केला जातो आणि नवस फेडण्यासाठी पशुमान दिला जातो. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी नवस फेडण्यासाठी यात्रा केली जाते. पशुमान दिला जातो. मात्र पशुमानाच्या नावाखाली अलीकडे गावात सर्रास पार्ट्यांचे पेव सुरु असून शेतशिवारात बसून जेवणाच्या पंगती वाढणे,
शेतशिवारात कचरा पसरविणे, पशुमानासाठी दिलेल्या बकरी, मेंढ्या आणि कोंबड्यांचे मांस आणि रक्त इतस्थतः फेकून देणे, देवीचा नवस फेडण्यासाठी करण्यात आलेल्या यात्रेत आप्तेष्ठांना बोलावून जेवणासहित दारूची पार्टी देणे, दारू आणि मांसाहारासाठी झालेल्या गर्दीमुळे गावात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, वाहतूक कोंडीमुळे ग्रामस्थांना होणारा त्रास, देवस्थानाच्या परिसरात असणाऱ्या शाळा, आरोग्यकेंद्र, शासकीय कार्यालये याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला होणारा मनस्ताप, यात्रेच्या नावाखाली होणारी दारुपार्टी आणि यासाठी येणाऱ्या तळीरामांकडून महिला आणि तरुणींची काढली जाणारी छेड! अशा अनेक कारणांसाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, हि झाली या निर्णयामागची एक बाजू.
श्री मळेकरणी देवस्थान आणि याठिकाणी होणारी प्रत्येक आठवड्यातील यात्रा यामागची दुसरी बाजू अशी कि, हे देवस्थान देसाई बंधू यांच्या मालकीचे आहे. सुमारे १५० ते २०० वर्षांची परंपरा, पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, देवस्थानात होणारे धार्मिक विधी, सालाबादप्रमाणे देवस्थानात आयोजिण्यात येणारे विविध कार्यक्रम या सर्व गोष्टी आजवर गोडीगुलाबीने होत आल्या.
देसाई बंधूंच्या खाजगी हक्काचे देवस्थान असूनही संपूर्ण उचगाव आणि बेळगाव पंचक्रोशीतील नागरिकांचे आराध्य असणारे श्री मळेकरणी देवस्थान! देसाई घराण्यातील एक स्त्री सती गेली आणि त्यानंतर या देवस्थानाची स्थापना झाली असे देसाई बंधू सांगतात. सध्या देसाई बंधूंची हि सहावी पिढी असून पिढीजात आजवर या देवस्थानाची निगा देसाई बंधूंच्या माध्यमातून राखली जात आहे.
पुढे या देवस्थानाचा महिमा इतका वाढला कि नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती वाढली. केवळ बेळगावच नाही तर गोवा आणि महाराष्ट्रातील भाविकही या देवस्थानात दर्शनासाठी येतात. मात्र ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयामागे षडयंत्र असल्याचा आरोप देसाई बंधूंनी केला आहे. मळेकरणी देवस्थानाला येणाऱ्या महसुलात भागीदारी हवी या कारणासाठी हा निर्णय लादला जात असल्याचा आरोप देसाई बंधूंकडून होत आहे. इतकेच नाही तर या देवस्थानात येणाऱ्या भाविकांचाही याच बाजूने कौल आहे.
एकीकडे या निर्णयाचे समाजातील जाणकारांकडून होत असलेले कौतुक आणि दुसऱ्या बाजूला देवीवर अगाध श्रद्धा असणाऱ्या भाविकांकडून घेतला जाणारा आक्षेप या दोन्ही गोष्टींमुळे सध्या उचगाव मध्ये संघर्षाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे ग्रामस्थांच्या गैरसोयीचा, आरोग्याचा, याठिकाणी सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न, शेतशिवाराची होणारी नासधूस असे अनेक प्रश्न तर दुसरीकडे भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्न! अशा अडकित्त्यात सध्या श्री मळेकरणी देवस्थानाच्या यात्रेचा मुद्दा अडकला आहे. या अडकित्त्यातून उचगाव ग्रामस्थ आणि परगावाहून येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा मुद्दा अलगदपणे सुटावा आणि सुवर्णमध्य साधून योग्य आणि समाजहितकारी निर्णय घेण्यात यावा, हीच श्री मळेकरणी चरणी प्रार्थना….!