बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील शेट्टी गल्ली येथील रस्त्याशेजारी एक सिमेंट काँक्रीटचा विजेचा खांब जुनाट होऊन धोकादायक स्थितीत उभा असून हा खांब तात्काळ बदलावा, अशी मागणी केली जात आहे.
शेट्टी गल्ली येथील एक पथदिपाचा सिमेंट काँक्रीटचा खांब इतका जुना झाला आहे की या खांबावरील सिमेंटचे संपूर्ण आवरण निखळून पडले असून आतील लोखंडी सळ्या दिसत आहेत.
सदर खांबावरून धोकादायक हाय टेन्शन (वोल्टेज) विजेच्या तारा गेल्या आहेत. त्यामुळे यदाकदाचित हा खांब कोसळल्यास अनर्थ घडू शकतो. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे.
त्यावेळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शेट्टी गल्लीतील सदर खांब कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा हेस्कॉमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा धोकादायक खांब तात्काळ बदलून त्या जागी नवा सिमेंट काँक्रीटचा खांब बसवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
शेट्टी गल्लीप्रमाणे शहर उपनगरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याशेजारील विजेचे खांब खराब होऊन धोकादायक स्थितीत उभे आहेत. या खांबांकडे देखील लक्ष देऊन दुर्घटना घडण्याची वाट न पाहता ते वेळीच बदलण्यात यावेत, असे मतही व्यक्त केले जात आहे.