बेळगाव लाईव्ह :चालुक्य एक्सप्रेस रेल्वेमध्ये चौघाजणांवर प्राणघातक चाकू हल्ला करून एका कर्मचाऱ्याचा खून करणाऱ्या त्या माथेफिरू प्रवाशाचा चार तपास पथकांद्वारे युद्धपातळीवर शोध घेण्यात येत असून रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे.
हुबळी कडून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या चालुक्य एक्सप्रेस मधील एस -8 या स्लीपर कोचमध्ये गेल्या गुरुवारी चाकू हल्ल्याची थरारक घटना घडली होती.
तिकीट तपासणीसाने (टीसी) तिकिटाची विचारणा केली म्हणून एका माथेफिरू प्रवाशाने टीसी सहभाजनांवर चाकूने हल्ला केला होता त्यामध्ये उत्तर प्रदेश येथील देवर्षी वर्मा (रा. उत्तर प्रदेश) या युवा रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर घटनेची गांभीर्याने दखल घेणाऱ्या पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी रात्रीपासूनच खानापूर गुंजी देसुर परिसरात हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे चाकू हल्ला झाला त्यावेळी कोणीच हल्लेखोराचा फोटो काढला नाही
त्यामुळे प्रत्यक्षदर्शी हल्ल्यात जखमी झालेले टीसी अश्रफ अली कित्तूर व अन्य दोघा जखमींनी केलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोराचे रेखाचित्र तयार केले आहे.
या रेखाचित्राच्या आधारे हल्लेखोराला पकडण्यासाठी रेल्वे पोलीस, आरपीएफ त्याचप्रमाणे नागरी पोलिसांकडून शोध मोहीम राबविली जात आहे. दरम्यान रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये देखील संशयित हल्लेखोराची छबी कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे.