शिष्य : गुरुजी, राजकारणाचं वातावरण फार चरमसीमेवर आलेलं आहे. समितीचे कार्यकर्ते झटत आहेत. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणवणारे एकनाथ शिंदे सीमाभागात भाजपच्या प्रचारासाठी येतात यामागचे गौडबंगाल काय?
गुरुजी : वत्सा, ज्यावेळी माणसाचा स्वाभिमान, स्वायत्तता गहाण पडते, ज्याच्या गळ्यात कितीही शूर असला तरी पट्टा येतो, त्यावेळी त्याचा आत्मसन्मान, आत्मभान सर्वकाही संपलेलं असतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे त्याच पठडीतील आहेत. ज्यावेळी ते आपल्या पक्षाला सोडून देशद्रोह, पक्षद्रोह करून भाजपच्या दावणीला गेले, त्यावेळी अमित शहांचे वेसण त्यांच्या नाकात आले. आणि त्यांचा स्वाभिमान कुठल्या कुठं निघून गेला. आता दरवेशाकडील अस्वलासारखी, कितीही ताकदवान असले तरीही नाकाला दुखणाऱ्या कडेवर नाचत राहण्याचं काम आता त्यांना करावं लागेल.
एकनाथ शिंदे नावाचा वाघ कधीचाच शेळी झाला आहे. त्यामुळे जरी भाजपने अनेक प्रकारे त्यांना शिवसेनेची झूल चढवली असली तरीही त्यांच्या या झुलीवरचे सर्व रंग उडून गेले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नावाचा लबाड कोल्हा लोकांच्या लक्षात आला आहे.
शिष्य : मग, आता सीमाभागातील त्यांच्याशी संलग्न असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील जनतेने कुणाकडे पाहायचे?
गुरुजी : सीमाभागातील जनता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा करून आजवर लढत आलेली नाही. त्यांचा लढा हा अस्मितेचा आहे. स्वतःचा स्वत्वाचा आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणत्या धोरणाने चालतो याच्याशी काहीच देणेघेणे नाही. त्यांना केवळ महाराष्ट्राची तमाम जनता त्यांच्या पाठीशी आहे एवढंच पुरेसं आहे. ६७ वर्षांपासूनची त्यांची लढाऊ भूमिका हि कुना एका व्यक्तीशी बांधलेली नसून महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या मातीशी एकनिष्ठ आहे.
शिष्य : मग एकनाथ शिंदेंचे धोरण हे चुकलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
गुरुजी : त्यांनी काय चुकावं आणि त्यांनी काय बरोबर करावं? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी ज्यावेळी शिवसेना सोडून स्वतंत्र चूल मांडली, त्यावेळी त्यांच्याशी बाकीच्या जनतेने काय अपेक्षा ठेवावी त्याचा भाग आज जनतेवर अवलंबून आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची चूक कि बरोबर हे आता नाही तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना निर्जनस्थळी जावं लागलं तर त्यांची चूक त्यांनाच उमगेल.
शिष्य : गुरुजी, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हात उदंड पद्धतीने लोकांना दान देण्यात प्रसिद्ध आहेत. अनेक गोष्टी त्यांनी सीमाभागासाठी दिलेल्या आहेत. असं असूनही सीमाभागातल्या लोकांनी त्यांचा निषेध करावा, हे चुकीचं नाही का?
गुरुजी : शिंदेंनी जे काही दिलं ते काही आपल्या खिशातलं दिलं नाही. तर महाराष्ट्राच्या तिजोरीतील दिलं. महाराष्ट्रातील तिजोरी हि महाराष्ट्रातील जनतेबरोबरच सीमाभागातील मराठी जनतेच्याही मालकीची आहे. त्यामुळे शिंदेंनी जे काही दिलं ते शिंदेंच्या घरच्या तिजोरीतील नसून महाराष्ट्राच्या तिजोरीतील आहे. त्यामुळे त्याच्यावर मालकी हि आम्हा सर्व लोकांची आहे. शिंदेंची वैयक्तिक नाही.
शिष्य : शिंदे सीमाभागात आले, तर त्यांचा मराठी माणसावर काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटत?
गुरुजी : ज्या माणसाची नीतिमत्ता संपलेली आहे, त्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवण्याइतपत सीमाभागातील जनता खुळी नाही. त्यांनी येऊन हजारो भाषणं ठोकली तरीही त्याचा कणभर फरक सीमाभागातील मराठी माणसावर होणार नाही. कारण कोणत्याही माणसाची एकदा विश्वासार्हता संपली असेल तर त्याच्यावर कुणीच विश्वास ठेवत नाही. त्यामुळे शिंदेंचा कोणताही परिणाम सीमाभागातील जनतेवर होणार नाही.
शिष्य : त्यांचे चिवचिव करणारे हस्तक आहेत, त्यांची चिवचिवाट आता चालू राहील का?
गुरुजी : पूर्वी एक म्हण होती, ‘पिंडीवरचा विंचू मारण्यासाठी चपलेचा वापर केला तर पिंडीला लागेल म्हणून लोक विंचू पाहून गप्प बसायची’! पण आता नव्या तंत्रानुसार आधी पिंडीवरचा विंचू बाजूला घेऊन त्याला ‘नाल्याच्या चपलेने’ ठोकायचे धोरण लोकांना आता चांगलेच अवगत आहे. आता त्यांचा चिवचिवाट करत येणारा चिवा ज्यावेळी सीमाभागात येईल त्यावेळी त्याला चांगलाच हिसका दाखवण्याचा हेतू सीमावासियांच्या मनात आहे. आणि आजवर सीमाभागातील जनतेला ज्यांनी ज्यांनी फसवलं, त्यांनी त्यांनी त्याचे परिणाम अनेक काळ भोगले. कित्येकजण राजकारणातून बेवारस झाले. यापद्धतीने शिंदेंचा चेला आणि शिंदे लवकरच राजकीय निर्जनवासात जातील यात शंकाच नाही.
शिष्य : गुरुजी, हे तुम्ही केवळ द्वेषापोटी आणि शिंदेंच्या रागापोटी बोलताय असं तर नाही ना?
गुरुजी : त्यांच्यावर राग ठेवण्याइतपत त्यांची गरज आम्हाला नाही! त्यांनी ज्यावेळी आमच्याविरोधात यायचं निश्चित केलं, त्याचवेळी ते आमच्यातून निघून गेल्याप्रमाणे आहे. एखादा माणूस मेळा तर त्याची स्मृती जपावी लागते. पण त्यांची स्मृतीही जपण्याइतपत त्यांनी काही केलं असं आम्हाला वाटत नाही. त्यांनी पूर्वी आमच्यासाठी लढा दिला, कारावास भोगला, त्यावेळी त्यांचा उदोउदो आम्ही केला. त्यांच्यावर अपार प्रेम दाखवले. पण एक गोष्ट अशी असते कि माणूस कायम बरोबर असेल आणि कधीतरी एकदा चुकला तर त्या चौकीवर पांघरून घालता येत नाही. कारण समाज टाकायचा असेल तर एखादी चूक नडू शकते आणि समाज बिघडू शकतो. हे बिघडणारं गणित सांभाळण्यासाठी सीमावासीय तयार नाहीत. त्यामुळे शिंदेंचा आणि आमचा मार्ग वेगळा झाला आहे. त्यांनी आता आपल्या मार्गाने जावे सीमावासीय आपला मार्ग आपणच निवडतील……