बेळगाव लाईव्ह:जिजाऊ ब्रिगेडच्या राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आज बुधवारी आयोजित हिंदू बाल संस्कार शिबिर मुला -मुलींच्या उस्फुर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले.
टिळकवाडी येथील न्यू उदय भवनच्या सभागृहात लहान बालकांपासून ते दहावीच्या मुला-मुलींसाठी या एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी नोंदणी,न्याहारी झाल्यानंतर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत,अन्य कार्यकर्त्या भगिनी आणि किशोर काकडे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेची पूजा करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. सोनाली सरनोबत यांनी शिबिरार्थी सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींचे स्वागत व कौतुक करीत शिबिराचा उद्देश सांगितला. हिंदु धर्म, पूजा विधी विषयी माहिती दिली.
शिबिराच्या पहिल्या सत्रात काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे यांनी देश की रक्षा हम करेंगे असे सांगत आपला हिंदु धर्म, वाचन, सुट्टीत घरातल्यांना मदत करणे विषयी माहिती दिली. तसेच देशभक्तीपर गाणी शिकविली. दुसऱ्या सत्रात ‘आत्मसंरक्षण कला’ (सेल्फ डिफेन्स) याविषयी यम्मी महारुद्र यांनी मुलांना माहिती देत महत्वाची प्रात्यक्षिके करुन घेतली.
भोजनापूर्विच्या सत्रात निमाई पाटील यांनी जीवनात योगाचे महत्त्व सांगत योगाभ्यास करुन घेतला. भोजनोपरांतच्या सत्रात सुनिता पाटणकर यांनी प्रबोधनपर गोष्टी सांगून कथाकथनाचे महत्व सांगितले. शेवटच्या सत्रात सुचिता पाटील यांनी ‘आर्ट व क्राफ्ट’ विषयी मुलांना माहिती दिली.
समारोप समारंभाप्रसंगी सकाळी घेतलेल्या विविध खेळातील विजयी मुला-मुलींना बक्षिसे देण्यात आली. याखेरीज सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्र व हनुमान चालीसा पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली. भारत माता की जय, गणपती बाप्पा मोरया, वंदेमातरम्, जय भवानी जय शिवाजी,देश की रक्षा हम करेंगे अशा घोषणा देत मुला मुलींनी शिबिरात उत्साही सहभाग दर्शविला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठान कार्यकारिणीच्या सदस्या नम्रता हुंदरे, कांचन चौगुले, गीता चौगुले, आशाराणी निंबाळकर, नीना काकतकर, मंगल पाटील, चंद्रा चोपडे, दीपाली मलकारी, विद्या सरनोबत, वृषाली मोरे, सर्व भगिनी कार्यकर्त्या व अन्य सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. राजश्री आजगांवकर यांनी विशेष सहयोग दिला. दीपाली मालकरी यांनी सूत्रसंचालन केले.