बेळगाव लाईव्ह : यात्रेतील शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होऊन 44 जण अस्वस्थ झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील केरूर येथे घडली आहे.
याबाबत समजलेली हकीकत अशी की चिकोडी तालुक्यातील केरूर येथील बेकेरी मळ्यात काल बुधवारी यात्रा पार पडली. यावेळी दुपारी यात्रेत अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दुपारी करण्यात आलेला महाप्रसाद शिल्लक राहिल्याने रात्री शिळे अन्न ग्रामस्थांनी सेवन केले. त्यामुळे विषबाधा होऊन रात्री उलटी व जुलाब सुरू झाल्याने अनेक जण अस्वस्थ झाले. पण सकाळी देखील उलटी जुलाब वाढून आणखीन अस्वस्थ झाल्याने सकाळी 44 हून अधिक जण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चिकोडीतील तालुका सरकारी इस्पितळात 31 जणांवर तर केरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच जण, एकसंबा येथील समुदाय आरोग्य केंद्रात आठ जणांवर उपचार सुरू आहेत. यात अबालवृद्धांसह, महिला व लहान मुलांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच चिकोडी अपर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एस एस गडेद, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केले.
चिकोडी सरकारी इस्पितळात मुख्य वैद्य अधिकारी डॉक्टर महेश नागरबेटा यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काही वर्षांपूर्वी तालुक्यातील हिरेकोडी येथे लग्न समारंभात विषबाधा झाल्याने 150 गुण अधिक जण अस्वस्थ होते. त्यानंतर आज केरूर येथे विषबाधेची घटना घडली आहे. या घटनेमुळे केरूर गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी सुकुमार यांनी बेळगाव लाईव्ह शी बोलताना सांगितले की सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून आरोग्यात सुधारणा होत आहे. कोणाच्याही जीविताला धोका नाही.
नागरिकांनी कोणतीही यात्रा असो किंवा खाजगी कार्यक्रमांमध्ये ताजे अन्न सेवन करावे. शिळे अन्न सेवन केल्याने ही घटना घडली असून पुढील काळात नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.