Wednesday, December 25, 2024

/

संघर्षाच्या इतिहासाला जरांगे पाटलांची साथ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भगवं वादळ, हलगीचा आवाज, जयघोषाच्या घोषणा आणि दमदार पावलांनी चालणारा नेता, आजूबाजूला जमलेली गर्दी, लोकांच्या डोळ्यातील आश्चर्य, लोकांच्या कौतुकमिश्रित नजर हे सगळं गोठवून ठेवल्यासारखं आहे…. ३० एप्रिल रोजी धर्मवीर संभाजी उद्यान परिसरातील दृश्य.. हजारो, लाखो, करोडोंच्या समर्थकांसह सभा घेणारा मराठ्यांचा नेता असतो तरी कसा? हे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते.

उत्साह, जल्लोष, कौतुक, आनंद याचे एक मिश्रण एकवटलं होत. मनोज जरांगे पाटील ज्यांनी उपोषण करून महाराष्ट्र सरकारला जेरीस आणलं होतं, मराठ्यांना आरक्षण देण्यास भाग पाडलं होतं, लढावं कसं, झगडावं कसं, आपलं म्हणणं मान्य कसं करायला लावावं याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील!

समोरचा कितीही अडेलतट्टू असुदे, त्याच्या घशातून आपली भूमिका कशी वदवून घ्यायची याच उत्तम ज्ञान असणारे जरांगे पाटील बेळगावच्या जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी बेळगावात दाखल झाले होते. आणि बेळगावच्या जनतेला त्यांच्याविषयी असणारं आकर्षणदेखल रस्त्यावर उतरलं होतं. औचित्य होतं मराठी समाजाच्या एकत्रीकरणाचं! बेळगाव आणि परिसरातील असणारा मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र यावा, संघटित शक्तीने आपली संस्कृती, भाषा आणि आपलं माणूसपण जपावं यावर मार्गदर्शन करण्यासाठी जरांगे पाटील बेळगावात आले होते. महाराष्ट्रात मोठं वादळ निर्माण करणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. प्रसारमाध्यमांच्या रूपाने अनेकांनी त्यांना दूरदर्शन, वॉट्सअप, फेसबुक या माध्यमातून पाहिलं होतं. पण प्रत्यक्ष जरांगे पाटील, त्यांचे भाषणं आणि त्यांची कार्यशैली अवगत करून घेण्यासाठी जनतेने संभाजी उद्यानात गर्दी केली होती.

ज्या मैदानावर अण्णासाहेब पाटील, बाळासाहेब ठाकरे, आर. आर. पाटील, मनोहर जोशी यांची वाणी खणखणली होती, त्याच मैदानात मराठ्यांचं खणाणतं चलनी नाणं तळपणार होतं. आणि हे सर्व साठवून घेण्यासाठी जनता अलोट गर्दी करून संभाजी उद्यानात जमली होती. जरांगे पाटील नावाचं एक साधं, सरळ व्यक्तिमत्व. केवळ ४०-४५ किलो वजन असावं, सामन्यातील सामान्य व्यक्तिमत्व म्हणता येईल, अशी शरीरयष्टी, किरकोळ बांधा, जगाच्या दृष्टिकोनातून अवाढव्य असं काहीच नसलेला माणूस! पण ज्यावेळी त्यांनी व्याख्यानाची सूत्र आपल्या हाती घेतली त्यावेळी लोकांना कळत गेलं कि या रूपात काहीतरी जादू आहे…! आणि ती जादू होती प्रामाणिकपणाची. आपल्या प्रत्येक गोष्टीची खात्रीशीर अशी माहिती लोकांच्यापर्यँत पोहोचविण्याची त्यांची खुबी होती. त्या व्यक्तिमत्वापाठीमागे केलेली तपश्चर्या होती. आणि हे सर्व लोकांना आवडत होतं, भावत होतं.. प्रत्येक वाक्यागणिक टाळ्या आणि घोषणा आणि घोषणांचा पाऊस पडत होता.Jarange

आजवर अनेक नेत्यांनी बेळगाव परिसरात भाषणे केली. मी असं करेन मी तसं करेन… पण कोण कोणत्या रस्त्याने जाणार आणि कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे, याबद्दल कधीच मार्गदर्शन केलं नाही. पण जरांगे पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वातून एक गोष्ट लक्षात आली कि, एखाद्या आंदोलनातून एखाद्या समस्येशी कसं भिडावं, लढावं आणि झगडावं, उत्तर कसं शोधावं, याचा निश्चित मार्ग त्यांच्याकडे आहे. त्यांनी आपल्या भाषणात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकजूट महत्वाची असल्याचे सांगितले. एकजूट असेल तर सीमाप्रश्न सुटण्यास विलंब लागणार नाही. तुम्ही विस्कळीत राहाल तर तुमचा सीमाप्रश्न कितीही काळ लढत राहिलात तरी सुटू शकणार नाही. कारण संघटित शक्तीचे बळ ज्यावेळी आपण उभं करतो त्यावेळी राज्यकर्त्यांना त्याच्यासमोर झुकावंच लागत. महाराष्ट्रात त्यांनी केलेल्या आंदोलनाला जे फळ आलं त्यामागे मराठ्यांची संघटित शक्ती एकवटली होती.Jarange speech

सीमावर्ती भागात लाखोंच्या संख्येने असणारा मराठी आणि मराठा माणूस ज्यावेळी एकत्रित येईल त्यावेळी भावी पिढीसाठी भविष्य निर्माण करण्याचं वचन जरांगे पाटलांनी सीमावासीयांना दिलं. त्यांनी प्रांजळपणे मान्य केलं कि माझा सीमाप्रश्नाविषयी अद्याप अभ्यास नाही. या मूळ प्रश्नाशी कसं झगडावं याची नीटपणे मी आखणी केली नाही. पण या प्रश्नाबाबत मी तुमच्या पाठीशी १०० टक्के उभा राहीन, अशी खात्री त्यांनी दिली. यासाठी त्यांनी काही वेळ मागितला. त्यातून एकंदर सीमाप्रश्नाचा आवाका काय? सीमाप्रश्नाचं नेमकं सूत्र काय? याचा मी अभ्यास करेन. तोवर तुम्ही एकत्रित या. संघटित शक्ती तयार करूया. आणि मग आपण या प्रश्नाला भिडूया आणि यातून आपण आपलं उत्तर निश्चित शोधूया.. अशा पद्धतीचं आवाहनही त्यांनी केलं. हे सर्व पाहता एक गोष्ट लक्षात येते, केवळ वल्गना करून प्रश्न सुटत नसतात. केवळ छातीठोकपणे भाषणे करून प्रश्न सुटत नसतात. तर त्यासाठी निश्चित एक रूपरेषा असावी लागते. ताशा पद्धतीची रूपरेषा तयार करण्याचे आवाहन जरांगे पाटलांनी स्वीकारलं. महाराष्ट्रातील जनता सीमावासियांच्या पाठीशी उभं करण्याची हमी दिली. एखादा नेता, कार्यकर्ता कशापद्धतीने एखाद्या आंदोलनाची उभारणी करू शकतो याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे सीमाभागात एक आशादायी चित्र निर्माण केलं.

हा सर्व खटाटोप करताना एक बाब लक्षात आली कि, आता निवडणुकीचा माहोल आहे, निवडणूक जवळ आलेली आहे. मराठी माणसाच्या हितासाठी असणारी एकमेव संघटना म. ए. समिती झटत आली आहे. या संघटनेला बळ देण्याचे काम या सभेमुळे मिळालं असं म्हणता येईल. त्यांचा उद्देश थेटपणे जरी म ए समितीच्या उद्देशाशी निगडित नसला तरीही इथला मराठी माणूस आणि मराठा माणूस हा बहुतांशी महाराष्ट्र एकीकरण समितीशी निगडित असल्याने येथील प्रश्न जरांगे पाटलांच्या दप्तरात ठेवण्याचं काम इथल्या जनतेने केले यात शंका नाही.

आज जरांगे पाटल्यांच्या रूपाने आपण आपलं प्रगतीपुस्तक पुन्हा एकदा मांडण्याचे ठरवले असले, ते जरी कोरे असले तरी त्यात अपेक्षित प्रगती आणि पस होण्याइतपत मार्क घेण्यात आम्ही यशस्वी होऊ. याबाबाबत बहुतांशी लोकांना आशादायी चित्र दिसत आहे. केवळ नेता विजय मिळवून देऊ शकत नाही तर त्यासाठी नेत्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. लोक एकत्र आले, नेत्याच्या सूचनांशी बांधील राहिले तर निश्चितपणे ६७ वर्षांचा लढा यशस्वी करण्यापर्यंत आपण जाऊ शकू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.