बेळगाव लाईव्ह :राज्यातील सर्व 28 खासदारांच्या सर्वसमावेशक कामगिरीच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की त्यांच्यापैकी बहुतेकांनी त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात कमी कामगिरी केली आहे.
या सर्वेक्षणात त्यांची संसदेतील उपस्थिती, विचारले जाणारे प्रश्न, महत्त्वाच्या चर्चेतील सहभाग आणि त्यांच्या संबंधित मतदारसंघातील कामगिरी यांचा विचार करण्यात आला. हे विश्लेषण सामाजिक शास्त्रज्ञ ए. आर. वासवी आणि जानकी नायर यांनी केले आहे.
सदर सर्वेक्षणातील एक विशेष निष्कर्ष असा आहे की बेळगावच्या खासदार मंगला सुरेश अंगडी यांनी संसदेत फक्त एका वादात भाग घेतला होता. जिथे त्यांनी बेळगाव विमानतळावरून अधिक उड्डाणे सुरू करण्याची विनंती केली होती.
मंगला सुरेश अंगडी यांच्यासह लोकसभेतील कर्नाटकच्या सर्व खासदारांची सरासरी एकत्रित उपस्थिती 71 टक्के असल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री व बेंगलोर उत्तरचे खासदार सदानंद गौडा, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री व धारवाडचे खासदार प्रल्हाद जोशी आणि विजयपूरचे खासदार रमेश जिगाजिनागी यांनी सभागृहात कधीही प्रश्न उपस्थित केला नाही.
याव्यतिरिक्त विश्लेषण निष्कर्षांनुसार कारवारचे (उत्तर कन्नड) खासदार अनंतकुमार हेगडे, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रल्हाद जोशी, विजयापुरा खासदार रमेश जिगजिनगी, चामराजनगर खासदार श्रीनिवास प्रसाद आणि चिक्कबेळ्ळापूर खासदार बाचे गौडा यांनी राष्ट्रपतींचे आभार मानण्याव्यतिरिक्त संसदेतील कोणत्याही चर्चेत भाग घेतलेला नाही.