Wednesday, December 4, 2024

/

आव्हानात्मक मातृत्वाला संधीच्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्या : गीतांजली पवार

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : जगातील सर्वात सुंदर शब्द म्हणजेच ‘आई’…! आई हे केवळ नाते नाही तर ती संपूर्ण कुटुंबाचा आधार असते. जग एकीकडे आणि आई एकीकडे. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात ‘मातृदिन’ म्हणजेच ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. संपूर्ण जगातच आईच्या त्यागाच्या असंख्य कहाण्या सांगितल्या जातात. परिस्थिती कशीही असो, आईसारखी लढवय्यी कुठेही नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे गीतांजली पवार…!

मूळच्या सोलापूरच्या आणि बेळगावच्या प्रवीण पवार यांच्याशी विवाह केल्यानंतर इथेच स्थायिक झालेल्या गीतांजली पवार या शंतनू पवार या स्पेशल चाईल्ड मुलाच्या आई आहेत. काही मुलं अशी असतात ज्यांच्या गरजा इतर मुलांपेक्षा जास्त आणि वेगळ्या असतात. अशा मुलांना प्रेमाची आणि काळजीची खूप गरज असते.

या स्पेशल चाइल्डस ना वाढवणं हे पालकांसाठी आणि विशेषतः एका आईसाठी मोठे आव्हानच असते. असे आव्हान पेलत आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी स्वतः खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभं राहात गीतांजली पवार यांनी व्यवसायाची उभारणी केली.

गृहोद्योगच्या माध्यमातून अत्यल्प गुंतवणुकीतून हळद, बेदाणे आणि मसाल्याचे उत्पादन सर्वप्रथम शेतातून सुरु करण्यात आले. पुढे एस. पी. फूड्स या नावाने व्यवसाय वृद्धिंगत होऊ लागला. विशेष बाब म्हणजे उत्पादित केलेल्या उत्पादनांचे पॅकिंग करण्याची जबाबदारी हळूहळू त्यांनी आपल्या मुलावर सोपविली.Geetanjali

आपल्या मुलाकडून होणाऱ्या या कामगिरीची दखल घेत पुढे स्पेशल चाईल्ड मुलांसाठी असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांकडूनदेखील हे कामकाज करून घेण्यास सुरुवात केली. भविष्यात मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, या दृष्टिकोनातून पॅकिंगची जबाबदारी स्पेशल चाइल्डस ना देण्यात आली. २५ हजारांच्या गुंतवणुकीपासून सुरु झालेल्या या व्यवसायाने आता २५ लाखांच्या उलाढालीची मजल पार केली आहे.

त्यांच्या या कामगिरीमुळे गीतांजली पवार या उद्योजिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. एका स्पेशल चाइल्डची जबाबदारी लीलया पेलत आव्हानात्मक मातृत्वाला संधी देत आपले मातृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या गीतांजली पवार यांचे उदाहरण प्रत्येक स्त्रियांच्या आयुष्यातील आव्हानांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.