बेळगाव लाईव्ह : राज्यातील १४ मतदारसंघासाठी काल मतदान पार पडले. बेळगाव जिल्ह्यामध्ये मंगळवारी झालेल्या निवडणुकीत ७८.६३ टक्के मतदान झाले आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान आणि त्यानंतर २०२४ साली झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत झालेले मतदान पाहता यंदा झालेल्या निवडणुकीची टक्केवारी अधिक आहे. २०१९ साली ७५.५२ टक्के मतदान झाले होते. यात जवळपास ३ टक्के इतकी सरासरी वाढ होऊन २०२४ साली ७८.६३ टक्के मतदान झाले आहे.
मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या पारड्यात जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. बेळगावमध्ये भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या बाजूने मतदारांचा कौल कमी असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. तर काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या बाजूने मतदारांनी अधिक कौल दिला असल्याची शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जगदीश शेट्टर हे बेळगाव बाहेरील उमेदवार असल्याने तसेच त्यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर झालेल्या नाराजीनाट्यामुळे जगदीश शेट्टरना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात काँग्रेस सरकारने दिलेल्या पाच हमी योजनांमुळे वाढलेल्या मतदारांचा टक्का हा हेब्बाळकरांच्या बाजूने झुकला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बेळगावमध्ये होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या मतांवर फरक पाडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाही मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
मात्र दुसरीकडे अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाही गेल्याने, स्थानिक नाही तर देशपातळीवरील राजकारणाचा विचार केल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मतांवर फरक पडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. २०२१ साली झालेल्या पोटनिवडणुकीत समितीच्या उमेदवाराने सव्वा लाखांचा टप्पा पार केला होता. मात्र या निवडणुकीत समितीला अपेक्षेप्रमाणे मतदान होईल, याची शक्यता खूप कमी व्यक्त केली जात आहे.
बेळगाव जिल्ह्यात काही अपवाद वगळता सर्वत्र निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली आहे. मात्र चुरशीने झालेल्या मतदानानंतर आता मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार हे येत्या ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.