बेळगाव लाईव्ह : महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी वाढल्या होत्या. जनतेची कोणतीच कामे वेळेत होत नाहीत. एका कामासाठी अनेकवेळा मनपाचे उंबरठे झिजवावे लागतात. अधिकाऱ्यांची पायधरणी करावी लागते.
कामांसाठी पैशाची मागणी केली जाते. कामगार नियुक्ती मध्ये भ्रष्टाचार यासह अनेक तक्रारी पुढे येत असतानाच याची दखल घेत मंगळवारी अचानक लोकायुक्त पोलिसांनी मनपाच्या जन्म मृत्यू दाखल विभागावर धाड टाकली. अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.
मंगळवारी करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आज महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच सतर्क झाले असून आज दिवसभर मनपामध्ये नैराश्याचे वातावरण असल्याचे दिसून आले.
अधिकारी आणि कर्मचारी कालच्या लोकायुक्तांच्या कारवाईनंतर ‘फुंक फुंक के’ पाऊल टाकत असून लोकायुक्तांच्या कालच्या कारवाईनंतर पुढे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
ढिम्म प्रशासकीय कारभारामुळे वैतागलेल्या नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. सुस्तावलेले कर्मचारी आणि अधिकारी कालच्या कारवाईनंतर जनतेची कामे मार्गी लावणार कि पुन्हा ये रे माझ्या मागल्याचाच पाढा वाचणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
काल उशिरा रात्रीपर्यंत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मनपामध्ये तळ ठोकून चौकशी केली असून जमा करण्यात आलेली माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख हणमंत राय यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी करण्यात आली असून लोकायुक्त पोलीस उपअधीक्षक बी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक अजिज कलादगी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी एकाचवेळी सर्वच विभागात शिरले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मनपा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. लोकायुक्तांनी विविध विभागांमध्ये जाऊन कामांचे स्वरूप, प्रलंबित असलेली कामे, हजेरीबुक तसेच कामाचा तपशील ताब्यात घेतला. दरम्यान जन्म आणि मृत्यू दाखला देण्याच्या ठिकाणी गेलेल्या लोकायुक्तांच्या कानावर नागरिकांच्या तक्रारी आल्या. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना देखील लोकायुक्तांनी फैलावर घेतले. मनपावर अचानकपणे घातलेल्या धाडीबाबत लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख हणमंत राय यांना विचारले असता जनतेने मनपा विरोधात तक्रारी दिल्या आहेत. यानुसार हि धडक कारवाई हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
काल लोकायुक्तांनी घेतलेल्या ऍक्शनमुळे मनपा अधिकारी तूर्तास तरी खडबडून जागे झाले आहेत. परंतु पाठ फिरताच पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था पुन्हा होईल कि लोकायुक्तांच्या धाडीमुळे जनतेला दिलासा मिळेल, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.