Thursday, December 26, 2024

/

राज्य सरकार विरुद्ध शहरात भाजपचे आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. युवतींच्या हत्या होऊन देखील राज्य सरकार झोपेतून जागे होत नसल्याचा आरोप करण्याबरोबरच या सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भारतीय जनता पक्ष बेळगावतर्फे आज सकाळी शहरात आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली.

भाजपतर्फे आज शनिवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून काँग्रेस सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये बहुसंख्य कार्यकर्त्यांसह भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चादरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, गॅरंटीचे आमिष दाखवून सत्तेवर आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरले आहे.

स्नेहा हिरेमठ हिचा खून झाल्यानंतर सरकारने तात्काळ व्यवस्थित क्रम घेतले गेले असते तर अंजली अंबिगेर हत्याकांड घडले नसते. विशेष म्हणजे अंजली हिने आपल्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा पुरवावी अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावरून राज्यातील जनतेची विशेष करून महिलांची आपल्याला काळजी नाही हे सिद्धरामय्या सरकारने दाखवून देत आहे. खुर्चीसाठी भांडणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघेजण संपूर्ण प्रशासनावर प्रतिकूल परिणाम होईल असे काम करत आहेत.

त्यांच्याकडून दिलेल्या गॅरंटीचीही पूर्तता तर होतच नाही उलट गॅरंटीच्या नावावर सत्तेवर आलेल्या काँग्रेसमुळे कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. याचा भारतीय जनता पक्ष तीव्र विरोध करत असून सरकारने महिलांना शाळा -कॉलेजेसना जाणाऱ्या मुलींना संरक्षण दिले पाहिजे. राज्यातील अन्यायग्रस्त महिलांना या सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे अन्यथा त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काय परिस्थिती होणार हे यांना कळेल. राज्यातील माता -भगिनी त्रासात आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र राज्य सरकारवर त्याचा कांही परिणाम होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांना फक्त अधिकार आणि त्या अधिकारापासून मिळणारे फायदे वगळता अन्य कशातही स्वारस्य असे नाही. कर्नाटकातील सरकारचे नांव सिद्धरामय्या सरकार असले तरी डी. के. शिवकुमार हेच जास्त ॲक्शन मोडवर पाहायला मिळतात.

स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेचा वापर करणारी ही जोडगोळी कर्नाटकचे वाटोळे करत आहे. तेंव्हा कर्नाटक सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा किंवा आपण राज्यातील महिला व युवतींच्या संरक्षणासाठी काय क्रम घेणार आहोत हे जाहीर करावे सांगून सदर मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज भाजपने आपल्या महिला मोर्चाच्या साथीने हे आंदोलन छेडले आहे, असे माजी आमदार संजय पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.