बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये अनेक अनुचित घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते अपघातांची संख्या अधिक आहे. अशातच बेळगाव उपनगर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन, शाळकरी मुलांच्या हाती दुचाकी असल्याचे सातत्याने दृष्टीस पडत आहे. इतकेच नव्हे तर अल्पवयीन मुलांच्या मागच्या बाजूला बसून स्वतः पालक दुचाकीवरून फिरत असल्याचे चित्रही दिसून येत आहे.
अल्पवयीन मुले वाहन चालवित असताना नियमांकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा मित्रांसाेबत स्पर्धा लावतात. रस्त्याने जाताना घोळक्याने जाण्याचा प्रयत्न करतात. यातून अपघाताचा धोका वाढतो, असे असले तरी बेळगावमधील अनेक भागात अनेक अल्पवयीन मुले बिनधास्तपणे वाहने चालवित असल्याचे दिसून येतात. यामुळे अपघात होत आहेत.
एकीकडे शहरात हेल्मेट सक्तीपासून एचएसआरपी, वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी यासह अनेक कारणास्तव कडक नियमांचे पालन करण्यास भाग पाडणारी रहदारी पोलीस यंत्रणा उपनगरात आणि ग्रामीण भागात मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
सज्ञान नसलेली ही मुले भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघातात सर्वाधिक अपघात दुचाकीचे. त्यात पुन्हा अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. नुकत्याच पुण्यातील अपघातानंतर या सर्व गोष्टी प्रकाशात आल्या आहेत.
परंतु मा. न्यायालयाने सदर प्रकरणी दिलेल्या निकालावर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुलांपेक्षा पालकच अधिक या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात सर्रास शाळकरी मुले, अल्पवयीन मुले दुचाकी बेफामपणे चालविताना दिसत आहेत.
शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी आदी ठिकाणी विद्यार्थी दुचाकीचाच वापर करत आहेत. चित्रपटांकडे मनोरंजन म्हणून पाहण्याऐवजी त्याचे अनुकरण करण्यात आजचे तरुण धन्यता मानत आहेत. ‘धूम’ स्टाईल बाईक चालविण्याचे अप्रूप वाटत असले तरी, त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. याला बहुतांश पालक तसेच नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेले वाहतूक पोलिस जबाबदार आहेत. शहरात एकीकडे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत असतानाच त्यात या तरुणांच्या बाईकची ‘धूम’ अधिकच भर घालत आहे.
शहरातील शाळा, महाविद्यालये व क्लासेस या सकाळी ठिकाणी फेरफटका मारला असता युवकांबरोबरच अल्पवयीन मुलेही विविध कंपन्यांच्या हायस्पीड बाईक, इलेक्ट्रिक बाईक, ‘धूम’ स्टाईलने कसरती करताना दिसून येतात. कित्येक ठिकाणी एकाच वाहनावरून तीन – चारजण बसून वेगाने वाहने चालविताना दिसतात. विशेष म्हणजे एकही तरुणाकडे वाहन परवाना असेल असे त्यांच्या वयोमानानुसार जाणवत नाही. ज्या अविर्भावात हे तरुण वावरतात याकडे पाहिले तर त्यांच्या पालकांची याला एकप्रकारे मूक संमती असल्याचे जाणवते. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याने चालणेदेखील मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत वेगाने धावणाऱया बाईक अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
अल्पवयीन मुले ज्या पद्धतीने दुचाकी चालवतात तो प्रकार अत्यंत गंभीर आहे. यात सर्रास शाळकरी मुलांना त्यांच्या पालकांच्या संमतीनेच वाहने दिली जातात हे स्पष्ट आहे. यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून मुलांना शाळेत दुचाकी आणण्यास निश्चितच बंदी घालणे गरजेचे आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वाहने देणे पालकांसाठी दंडात्मक आहे, असे आरटीओने जाहीर केले आहे. यासाठी नवी नियमावलीहि आहे. परंतु पालकांनी या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी बेळगावमध्ये अल्पवयीन मुलाला दुचाकी दिल्याबद्दल पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचेही आपण पाहिले आहे. मात्र याचे गांभीर्य माहित नसणाऱ्या पालकांनी अद्याप मुलांना दुचाकी देणे थांबविले नसल्याचेच दिसून येत आहे.
सर्रास ग्रामीण भागात शेतशिवारात जाणाऱ्या पालकांकडून आपल्या शाळकरी मुलांना दुचाकी चालविण्यासाठी दिली जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनात येते. परंतु शहरात वाहतुकीच्या सेवेत व्यस्त असणाऱ्या पोलिसांचा सहसा याठिकाणी संपर्क येत नसल्याने पालकही निर्धास्तपणे आपल्या मुलांकडे वाहने देत असल्याचे दिसून येत आहे. एकंदर परिस्थिती पाहता पालकांनी हि बाब गांभीर्याने घेत सरकारी नियम पाळून आपल्या मुलांच्या हितासाठी कटाक्षाने त्यांच्याकडे दुचाकीच्या चाव्या सोपविणे टाळले पाहिजे. याचबरोबर पोलीस विभागाने शहरासह ग्रामीण भागातही या संदर्भात जनजागृती करणे तसेच यावर आळा घालणे गरजेचे आहे.