Sunday, June 23, 2024

/

काय सांगतात लोकसभेची विजय-पराभवाची गणिते?

 belgaum

बेळगाव लाईव्ह: कर्नाटकात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता प्रत्येकाला प्रतीक्षा लागली आहे ती ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची! सर्वांचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव लोकसभा मतदार संघात आणि चिकोडी मतदार संघात कस लागणार आहे तो दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा..

भाजपचे उमेदवारीवरून सुरु असलेले अंतर्गत नाराजीनाट्य, काँग्रेसच्या हमी योजना, नव्या चेहऱ्यांना दिलेली संधी, विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि काँग्रेसला रामराम ठोकलेले नेते आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचे दिसून आलेले परिणाम या एकंदर परिस्थितीचा निकालावर कोणता परिणाम होणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.

बेळगाव लोकसभा मतदार संघात एकूण ८ विधानसभा मतदार संघांपैकी ५ मतदार संघात काँग्रेसची सत्ता आहे. तर उर्वरित ३ मतदार संघात भाजपाची सत्ता आहे. अरभावी, गोकाक आणि बेळगाव दक्षिण हे तिन्ही बालेकिल्ले भाजपने आपल्याकडे शाबूत ठेवल्याने या भागातून भाजपाला आघाडी मिळेल असा विश्वास भाजपाला आहे. तर उर्वरित ५ मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व काँग्रेसला आघाडी मिळवून देईल, असा विश्वास काँग्रेसला आहे. मात्र दोन्ही पक्षांमध्ये असणाऱ्या अंतर्गत राजकारणामुळे अंतिम क्षणापर्यंत बाजी कोण मारणार हे सांगणे अशक्य आहे.

 belgaum

चिकोडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसने प्रियांका जारकीहोळी या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. याविरोधात भाजपचे अनुभवी नेते, विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले हे निवडणूक रिंगणात उतरले. तर बेळगाव लोकसभा मतदार संघातही मृणाल हेब्बाळकर या नव्या चेहऱ्याला काँग्रेसने संधी दिली.

याउलट भाजपने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना निवडणूक रिंगणात उतरवले. काँग्रेसने निवडणूक रिंगणात उतरवलेले दोन्ही उमेदवार हे मातब्बर राजकीय पार्श्वभूमीतून आहेत. यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एकंदर घटनाक्रमाचा तपशील पाहता मतदारांनी विजय – पराभवाची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे.

आजवरचे वास्तव आणि इतिहास पाहता निवडणुका जवळ आल्या कि एकमेकांविरोधात लाट निर्माण होते. भाजपमध्ये गोकाक आणि अरभावीत जारकीहोळी तर बेळगावमध्ये दक्षिण आमदार यांच्याविरोधात नेहमीच लाट निर्माण होते. Loksabha

दुसरीकडे काँग्रेसमधील काही नेतेही नाराज असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. उमेदवारीवरून अंतर्गत राजकारण सुरु असून काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये राहूनही केवळ पोटतिडीकीमुळे भाजपच्या बाजूने अंतर्गतरित्या प्रचार केल्याची माहितीही राजकीय सूत्रांकडून उपलब्ध होत आहे.

या एकदंर राजकीय बेरीज – वजाबाकीच्या समीकरणाचा निकालावर कोणता परिणाम होणार आणि मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे येत्या ४ जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.